नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने राज्यातील वीज वितरण अडाणीला दिल्यानंतर मागील तीन महिन्यापासून वीज बिलांमध्ये होणारी वाढ जनतेतील कोणीही वाचत नाही. यावरुन जनता आपल्या अधिकारांबद्दल षंढ झाली आहे काय? अशी शंका यायला लागली आहे.खरे तर राज्यातील वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्यावर बहिष्कार टाकावा तर एकाच महिन्यात वीज कंपनी वठणीवर येईल.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील विज वाहतुक करण्याचा ठेका अडाणी कंपनीला दिला. आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुध्दा अडाणीच्या हातातच सर्व सत्ता आहे की, काय अशी परिस्थिती दिसते आहे. अडाणीकडे ठेका दिल्याबरोबर विज बिलांमध्ये झालेली वाढ जनता दुर्लक्षीत करीत आहे. ऑगस्ट 2024 च्या अगोदरचे बिल आणि आता सप्टेंबरपर्यंतचे बिल जनतेने तपासून पाहावे त्यामध्ये 35 ते 40 टक्यांची वाढ झाली आहे. वीज कंपनीकडून होणारी ही दिशाभुल जनतेने सहन न करता त्याविरुध्द क्रांती करणे आवश्यक आहे. नाही तर असेच सर्व चालत राहिल आणि वीज कंपनी ग्राहकांचे खिसे रिकामे करेल.
मार्च 2017 मध्ये वीज बिलांमध्ये स्थिर आकार 55 रुपये होता. एप्रिल 2017 मध्ये तो 59 झाला. मे-2027 मध्ये हा स्थिर आकार 60 रुपये झाला. एप्रिल 2018 मध्ये 62 रुपये झाला. मे 2018 मध्ये हा स्थिर आकार 65 रुपये झाला. 65 रुपयांच्या या स्थिर आकारात ऑक्टोबर 2018 मध्ये 15 रुपयांची वाढ करून तो 80 रुपये करण्यात आला. अशा प्रकारे प्रत्येक महिन्याचे बिल पाहा ते ऑगस्ट 2024 मध्ये घरासाठी 138 रुपये झाला आहे आणि व्यापाऱ्यांसाठी 500 रुपयांपेक्षा जास्त स्थिर आकार करण्यात आला आहे.
वहन आकार @1.8Rs/U हा नवीन आकार वीज बिलांमध्ये जोडला गेला आणि त्यामुळे मागील बिलांच्या तुलनेत आजचे वीज बिल 35 ते 40 टक्यांनी वाढले आहे. वीज कंपनी दर महिन्यात कोणता ना कोणता आकार गुपचूप वाढवत आहे आणि त्यामुळे वीज कंपनी गुपचूपपणे लोकांची लुटमार करत आहे. आजच या वाढत्या विज बिलांवर आवाज उठविला नाही तर जनतेला असेच नवीन आकार वाढत राहतील आणि विज बिलांचा आकडा आवाढव्य होत राहिल. आम्ही हे फक्त लिहुच शकतो. या विरुध्द मुळ आवाज उठविणे हे जनतेचे काम आहे. पण आजपर्यंत कोणीच आवाज उठविला नाही म्हणून जनता षंढ झाली आहे काय? अशी शंका घेण्यास जागा आहे.