नांदेड(प्रतिनिधी)-तीन वर्षापुर्वी प्रेमविवाह करणे एका 27 वर्षीय अनुसूचित जातीच्या युवकाला महागात पडले आहे. त्यासाठी त्याला आपला जीव गमावावा लागला.याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन जणांच्या नावासह खून आणि ऍट्रॉसिटी कायदाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
करण सुरज गायकवाड आणि त्याचा भाऊ शिवम सुरज गायकवाड हे लहानपणापासूनच आपल्या आई-वडीलांची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती म्हणून ते मामाकडे राहिले. त्यांच्या सर्व कागदपत्रांवर वडीलांच्या जागी मामाचेच नाव आहे. शिवम गायकवाडने तीन वर्षापुर्वी सिमरनकौर नावाच्या युवतीशी प्रेमविवाह केला होता. तो विवाहनंतर आपल्या पत्नीसोबत रहिमपुर येथे राहत असत. त्याच्या प्रेमविवाहने सिमरनकौरचा भाऊ पलविंदरसिंघ लक्ष्मणसिंघ चव्हाण आणि शिवम गायकवाडचा साडू देवासिंघ हे शिवमच्या प्रेमविवाहवर नाराज होते. ते सिमरनकौरला सांगत असे की, तु हे लग्न करण्याऐवजी मरुन गेली असती तर चांगले झाले असते. आमची समाजात तु काही इज्जत ठेवली नाहीस.
17 सप्टेंबर रोजी शिवम गायकवाडच्या घरातील गॅस सिलेंडर संपल्याने करण गायकवाड आपल्या वहिनी सिमरनच्या आई कमलजितकौर नागरे यांच्या घरी जेवायला गेला होता. तेंव्हा त्या म्हणाल्या की, तु लवकर जा पलविंदरसिंघ व देवासिंघ तुझ्यावर हल्ला करतील, तुला जिवे मारुन टाकतील. दि.21 सप्टेंबर रोजी करण गायकवाडच्या आजी कमलबाईने करणला सांगितले की, शिवम घरी नाही पण मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. कारण शिवम कामासाठी बाहेर जातच असे. 22 सप्टेंबर रोजी मला शेषराव शास्त्री यांनी फोनवर सांगितले की, नावघाटच्या परिसरातील नदीपात्रात एक डेडबॉडी सापडली आहे ती तुझ्या भावाची आहे का पाहा. मी जाऊन पाहिले तर ती डेडबॉडी माझा भाऊ शिवम गायकवाडचीच होती. आम्ही अनुसूचित जातीच्या असल्याचा राग धरुन माझा भाऊ शिवमने केलेल्या अंतर जातीय विवाहच्या कारणावरून माझी वहिनी सिमरनकौर हिच्या आई-वडीलांच्या घरी पलविंदरसिंघ लक्ष्मणसिंघ चव्हाण व त्यांचा भावजी देवासिंघ या दोघांनी धार-धार शस्त्राने शिवमच्या मानेवर, डोक्यावर हल्ला करून त्याचा खून केला आणि त्याचे प्रेम गोदावरी नदी पात्रात फेकून दिले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 238, 3(5) आणि ऍट्रॉसिटी कायदा कलम 3(2)(व्ही), 3(व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास ऍट्रॉसिटीशी संबंधीत असल्याने हा गुन्हा तपासासाठी पोलीस उपअधिक्षकांकडे वर्ग करण्यात आला आहे. वृत्तलिहिपर्यंत शिवमच्या मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती.