नांदेड (प्रतिनिधी)- मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड च्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदूविकार असणाऱ्या मुला-मुलींच्या रौप्यमहोत्सवी आरोग्य शिबिरास गुरुवार दि. 19 सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या आरोग्य शिबिरासाठी मुंबई येथील तब्बल 35 तज्ञ डॉक्टरांची टिम दाखल झाली आहे. यावेळीही आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर. आर. पटवारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजितकौर जज, धर्मादाय उपआयुक्त ममता राखाडे, धर्मादाय सहआयुक्त एच. के. शेळके, लातूर येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जि.प. चे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत सातत्यपूर्ण चालणाऱ्या या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
आरोग्य शिबिरात तपासणी व उपचारासाठी मराठवाडा, विदर्भ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून रुग्ण येतात. रुग्ण व त्यांच्या समवेत आलेल्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, बनारसीदास अग्रवाल, अंकित अग्रवाल, विजेंद्र काबरा व मूख्याध्यापक नितीन निर्मल शिबीर स्थळी पूर्णवेळ उपस्थित आहेत.
आरोग्य शिबीरातील रूग्णांवर प्रसिध्द बालमस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडे, डॉ. आशा चिटणीससह पस्तीस तज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करीत आहेत. आरोग्य शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांना सहा महिन्यांची म्हणजेच आगामी आरोग्य शिबिरापर्यंतची मोफत औषधी देण्यात येते. आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मूख्याध्यापक नितीन निर्मल, वसतीगृह अधीक्षक संजय शिंदे व आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.