“वात्सल्य” योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचा सहभाग राहणार

 

• *18 सप्टेंबरला नांदेडची मुले अर्थमंत्र्यांना थेट ऐकणार*

नांदेड:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात 18 सप्टेंबर रोजी होत आहे. नवी दिल्ली येथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग आहे. देशातील मोजक्या जिल्ह्यामध्ये नांदेडचा सहभाग निश्चित झाला असून हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात होणार आहे.

 

नांदेड जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय विद्यालय विमानतळ रोड नांदेड येथे 50 विद्यार्थी व 50 पालकांच्या सहभागात जिल्हा या राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला दिल्ली येथून संबोधित करणार आहेत.18 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 4.30 या काळामध्ये हा कार्यक्रम होणार असून नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शिखर बँकेमार्फत हे आयोजन करण्यात आले आहे.

 

*काय आहे वात्सल्य योजना*

वात्सल्य ही शून्य ते 18 वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान 1 हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रुपये जमा करू शकतो. मुलाच्या 18 वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे. मुलगा 18 वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केले जाऊ शकते. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते शून्य ते 18 या वयोगटात उघडण्याची ही योजना आहे. मुलांसाठी दीर्घकालनी बचत आणि आर्थिक नियोजनाला यामुळे हातभार लागणार आहे. भारतीय नागरीक असणे ही या योजनेची प्राथमिक अट असून नागरिकांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यातून आर्थिक सुरक्षा निर्माण केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!