नांदेड(प्रतिनिधी)-दरोड्याची खोटी तक्रार घेवून आलेला तक्रारदारच खोटा निघाला. आता त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयोध्यानगरी मालेगाव रोड नांदेड येथील विनायक पुंडलिक कदम (24) याने अर्धापूर पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले की, दि.14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास माझ्या वडीलांनी साखर कारखाना येळेगाव ता.अर्धापूर येथील चेअरमन गणपतराव तिडके यांना देण्यासाठी 2 लाख 65 हजार रुपये दिले होते. ते घेवून जात असतांना पिंपळगाव ते येळेगाव रस्त्यावरील दिग्रस गावापासून 500 मिटर अंतरावर आलो असतांना अनोळखी तिन इस्मांनी मोटारसायकलवर येवून माझा रस्ता अडविला आणि माझ्याकडील 2 लाख 65 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल बळजबरीने चोरुन नेला आहे. अर्धापूरचे अत्यंत चाणाक्ष पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी या तक्रारीबाबत पोलीस उपनिरिक्षक अतुल भोसले आणि पोलीस अंमलदार आडे यांना बोलावून घटनेची जागा पाहा आणि पुढील कार्यवाही करा असे सांगितले. कारण विनायक कदमचे लणे त्यांना विश्र्वासदर्शक वाटत नव्हते. पोलीस उपनिरिक्षक भोसले आणि पोलीस अंमलदार आडे यांनी विनायक कदमची चौकशी केली असता मला वडीलांनी दिलेल्या 2 लाख 65 हजार रुपये मी माझ्यावर कर्ज असलेल्या जयस्वाल यांना नवा मोंढा नांदेड येथे जावून दिल्याचे सांगितले. तसेच माझा मोबाईल सुध्दा जयस्वाल यांनीच घेतला असल्याचे सांगितले. असा सविस्तर जबाब अर्धापूर पोलीसांनी नोंदवून घेतला.
एकदम कमी वेळेत अर्धापूर पोलीसांनी घटनेचे सत्य शोधून काढले. आणि आता विनायक पुंडलिक कदम(24) विरुध्द अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर आनंदराव कदम यांनी तक्रार दिली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 240 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव आदींनी अत्यंत बारकाईने तपासणी करून खोटी तक्रार देणाऱ्याला उघडे पाडण्यासाठी अर्धापूर पोलीसांचे कौतुक केले आहे.