सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलची नजर

नांदेड –सण उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या काळात सर्व धर्मियांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, वेगवेगळ्या प्रतिकृती, वेगवेगळ्या सणांच्या मिरवणूक नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या संदर्भातील प्रसिद्धी, बातम्या, लेख, अग्रलेख, फोटो, व्हिडिओ देताना अतिशय गांभीर्याने वृत्तांकन होईल, याबाबतची विनंती सर्व माध्यम प्रतिनिधींना करण्यात आली आहे.

 

तथापि, काही अनधिकृतरीत्या वेब पोर्टल चालविणारे, तसेच सोशल मीडियाचा गैरवापर करणारे असामाजिक तत्व वृत्त देताना,पोस्ट करताना, सामाजिक जाणीवांचे भान ठेवत नाही. अशांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

त्यामुळे समाज माध्यमांचा योग्य प्रकारे सर्वांनी वापर करावा. तसेच नागरिकांनी देखील समाज माध्यमांवर येणाऱ्या कोणत्याही पोस्ट बद्दल प्रतिक्रिया देताना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वरील पोस्ट नेमक्या कुठल्या आहेत याची खातर जमा करावी. शांततेने प्रतिक्रिया व्यक्त करावी. पोलिसांची मदत घ्यावी.

काही समाजकंटक अशा वेळी जुन्या पोस्ट टाकून लोकांची दिशाभूल करतात. परस्परांच्या धर्माविरुद्ध, धार्मिक कार्यक्रमासंदर्भात अफवा पसरवितात, टीका टिपणी करतात, त्यामुळे जनतेने सावध असावे.

नांदेड शहराला सर्व धर्मियांच्या सामंजस्याचा चांगला इतिहास आहे .त्यामुळे कोणतीही चुकीची पोस्ट समाज माध्यमांवर आल्यावर त्याबाबत जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. नांदेडच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, सोशल मीडिया, मेडिया इन्फ्लुअन्सर, शांतता समितीच्या सदस्यांनी अशा प्रकारे माध्यमांचा कोणी गैरवापर करत असेल तर याबाबत पोलीस विभागाला अवगत करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!