नांदेड(प्रतिनिधी)-पिंपळढव-आंबाडी घाटाच्या शिवारात सापडलेल्या अनोळखी, जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचा गुंता पोलीसांनी उकलून काढला आहे आणि त्या व्यक्तीला मारुन त्याचा खून करणाऱ्या तेलंगणातील दोघांना ताब्यात घेतले आहे.
दि.7 सप्टेंबर रोजी पहाटे पिंपळढव शिवारात एक जळालेल्या अवस्थेतील अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले. त्याचे नाव नारायण जानाकोंडा (38) रा.पिंपळकोटी ता.भिमपुर जि.आदिलाबाद असे होते. मरणाऱ्याच्या आसपास काही साहित्य सापडले नाही, जंगलात सीसीटीव्ही नसतात, त्यांना जातांना-येतांना कोणी पाहिल्याचा सुगावा लागला नाही. अर्थातच कोणताही धागादोरा नसतांना पोलीस त्या गुन्ह्याचा शोध घेणार नाहीत असे होत नाही. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकातील पोलीस उपअनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, गंगाधर कदम, सुरेश घुगे, संजीव जिंकलवाड, देविदास चव्हाण, हेमंत बिचेवार आणि संतोष बेल्लूरोड आदींनी बरेच दिवस त्याच भागात ठाण मांडून राहिले. पोलीसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार मरण पावलेला नारायण जानाकोंडाची पत्नी आणि त्याच गावातील विनोद नरसींग मारशेट्टी(47) यांचे आपसात संबंध होते आणि त्यातूनच नारायण आणि त्यांच्या पत्नीमध्ये नेहमी वाद होत होता. पण यांचे संबंध काही थांबले नाहीत.
दि.6 सप्टेंबर रोजी रात्री विनोद नरसींग मारशेट्टीने गावातील आपला दुसरा मित्र देवन्ना शिवन्ना बोनगिरी (48) याला सोबत घेतले आणि नारायणला भरपूर दारु पाजवून आंबाडी घाटात आणले. आंबाडी घाटात त्याच्यावर चाकुने हल्ला केला. तो खाली पडला. परंतू मरण पावला नाही म्हणून गाडीतील पेट्रोल काढून त्याच्या अंगावर टाकले आणि त्याला आग लावून दिली. त्यामुळे नारायणचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अखेर पोलीसांनी लावलेला शोध प्रशंसनिय आहे.
तोंडी आदेशाचा खेळ आजही एलसीबीत सुरू आहे
माजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील काही लोकांच्या बदल्या केल्या. त्यातील गुंडेराव कर्ले आणि देविदास चव्हाण या दोघांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील एटीबी(दहशतवादी विरोधी पथक) मध्ये बदली केली. पण हे दोघे स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत मांडवी पोलीस ठाण्याच्या तपासासाठी का गेले हा प्रश्न समोर आला आहे. फक्त खोल्या बदलून केलेल्या या बदल्यांमध्ये ही मंडळी तोंडी आदेशाने पुन्हा स्थानिक गुन्हा शाखेतच कार्यरत आहेत अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. काही दिवसांपुर्वीच त्यांना स्थानिक गुन्हा शाखेतून कार्यमुक्त करण्यात आले अशी नोंद करण्यात आली होती. पण ते आजही स्थानिक गुन्हा शाखेत काम करत आहेत. तो तोंडी आदेश कोणाचा याचा काही पत्ता लागत नाही. अशाच प्रकारच्या तोंडी आदेशावर जवळपास 2 वर्ष पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणूसिंग चव्हाण आजही स्थानिक गुन्हाशाखेच्या खुर्चीतच विराजमान असतात. असेच चालणार सेल तर काही निवडक लोकांच्या नावावर स्थानिक गुन्हा शाखेची 7/12 करून दिली तर छान होईल.
संबंधीत बातमी..
आंबाडी-पिंपळढव जंगलात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटली