पुणे(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगवेगळे ऍप वापरून आपल्या कर्तव्यात नेहमी दक्ष राहणे आजच्या तंत्रज्ञान युगात महत्पुर्ण झाले आहे. त्यासाठी पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीसांना पुढील वेतनापासून भ्रमणध्वनी भत्ता जोडून द्यावा अशी मागणी पुणे येथील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अनिल बाळासाहेब गावडे यांनी केली आहे.
पुणे येथे दळण-वळण व माहिती तंत्रज्ञान या विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अनिल बाळासाहेब गावडे हे माजी वृंद परिषदेचे सदस्य सुध्दा आहेत. सध्याच्या धावत्या तंत्रज्ञान युगात पोलीस विभागाला सुध्दा तंत्रज्ञानाशी जोडून राहणे आवश्यक झाले आहे. पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मायसेफ ऍप, 112 ऍप, तसेच पोलीस स्टेशन अंतर्गतच्या कामासाठी दैनंदिन हजेरी, ड्युटी चार्ज, बंदोबस्त, फोटो स्कॅन, कॉल अपडेटींग, लोकेशन, आरोपींची माहिती, कायदा व सुव्यवस्था राखतेवेळी वरिष्ठांशी होणारे संभाषण यासाठी महागडे मोबाईल वापरणे आवश्यक झाले आहेत. ते वापरत असतांना नेट वापराचा खर्च येतो. मोबाईलवर उत्तर दिले ना त शिस्तभंगाची कार्यवाही होते. मोबाईलच्या व्हाटसऍपवर आलेल्या संदेशांना वेळेत पाहिले नाही, त्याची पुर्तता केली नाही तरी परिस्थिती गंभीर होते.
यासाठी दैनंदिन कर्तव्य करतांना पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना स्वत:खर्च करून जास्तीचा मेमरी डाटा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. सध्या रिचार्ज खर्च वाढत आहे. तो खर्च पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार आपल्या वेतनातून करतात. यासाठी पोलीस विभागातील अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना हा खर्च भागविण्यासाठी दर महा 3 हजार रुपये भ्रमणध्वनी भत्ता वेतनातच जोडून द्यावा अशी मागणी अनिल बाळासाहेब गावडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.