गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता कमिटीची बैठक संपन्न
नांदेड – सण उत्सवाच्या काळात शांतता अबाधित राहील यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. समाजमन कलुषित होणार नाही याचीही दक्षता आपण समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने घेतली पाहिजे. आपण कोणत्याही धर्माचे असू पण इतर धर्माबद्दल आदर बाळगावा असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी केले. ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हा शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते.
गणेशोत्सव, ईद-ए- मिलाद, वर्षवासानिमित्त जिल्हा शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, आर डी सी वडदकर, ॲडिशनल पोलीस अधीक्षक सुरज गुरव, डी वाय सप आयपीएस कृतिका मॅडम, उपायुक्त गिरीश कदम, नगरसेवक दुष्यंत सोनाळे, वसिम भाई शोयब तसेच गणेशोत्सव मित्र मंडळाचे पदाधिकारी व मुस्लिम पदाधिकारी ही उपस्थित होते.
पुढे बोलताना पंयाबोधी म्हणाले की, भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी एक दुसऱ्या धर्माचा आदर करावा कोणी कोणाचा द्वेष करू नये. वैराने वैर शांत होत नाही तर प्रेमभावनेनेच ते शांत होते. भारतीय संविधानाने सर्वांना धर्म स्वातंत्र्य दिलेले आहे. कोणीही कोणाच्या धर्मावर टीका टिप्पणी करू नये. अर्वाच्य भाषेचा वापर करू नये. महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलेले आहे, त्यांच्याविषयी अपशब्द बोलू नये. सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा असेही ते म्हणाले.