शिक्षकच निघाला भक्षक; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भाग्यनगर पोलीसात गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या पाल्यांना शिक्षण मिळावे म्हणून खेडेगावातील पालक आपल्या पाल्यांना येथे वस्तीगृहात किंवा खाजगी खोली घेवून राहण्याची सोय करतात. सध्याच्या काळात शिकवणी (क्लासेस) हा धंदा पण मोठा झाला आहे आणि या धंद्यात शिक्षकीपेशा येत नसणारे अनेक जण मालक झाले आहेत. त्या ठिकाणी शिकवण देण्यासाठी घेतले जाणारे शिक्षक पुर्ण तपासणी न करताच घेतले जात आहेत आणि त्यातून अल्पवयीन बालिकांवर अत्याचाराचे प्रकार घडू लागले आहेत. कालच एका शिक्षकाने केलेल्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पालकांना कोणावर विश्र्वास करावा या संदर्भाने विचार करण्याची वेळ आहे.
भारतीय संस्कृतीत गुरु साक्षात परब्रम्ह या शब्दात त्यांचा सन्मान करण्याची प्रथा आहे. भारतातील अनेक महापुरूष आश्रम शाळांमध्ये राहुन शिकलेेले आहेत आणि त्यांचे नाव आजही आपण घेतो. त्या शिक्षकांची नावे सुध्दा प्रसिध्द आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्ही मोठे व्यक्ती झालो असे ते विद्यार्थी पण सांगतात. भविष्यातील पिढी तयार करण्याची जबाबदारी या शिक्षकांवर असते. या शिक्षकांनीच आपल्या मनात दुर्देवी भावना आणली तर ते भविष्यातील पिढीला काय शिक्षण देतील. अशा परिस्थितीत शिक्षकांकडून अपेक्षा कशी पुर्ण होईल. आमच्या लिखाणा अर्थ सर्वच शिक्षक असे असतात असे आम्हाला म्हणायचे नाही. परंतू ज्या पदावर ते काम करत आहेत. त्या पदा विषयी उल्लेख करणे आमची जबाबदारी आहे.
महाराष्ट्र शासनाने एका शासन निर्णयानुसार 1 ली ते 10 वी वर्गासाठी शिकवणी अर्थात क्लासेस बंद करा असा निर्णय घेतला होता परंतू आजही ही शिकवणी सुरूच आहे. अशाच एका शिकवणीमध्ये काल कॅनॉल रोडवर भयंकर प्रकार घडला. एक 17 वर्षीय बालिका तेथे शिकवणीला आली असतांना तिच्यासोबत त्या शिकवणी वर्गामध्ये शिक्षक असलेल्या नागेश गंगाधरराव जाधव (48) याने केलेला प्रकार एवढा भयंकर आहे की, ते लिहिण्याची ताकत आमच्या लेखणीत नाही. पण हा सर्व प्रकार अल्पवयीन बालकांचा लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम (पोक्सो) यामध्ये मोडतो. तसेच ती बालिका अनुसूचित जमातीची आहे. हा घडेला सर्व प्रकार पोलीस ठाणे भाग्यनगर यांनी गुन्हा क्रमांक 428/2024 नुसार भारतीय न्याय संहितेतील कलमे 74, 75 आणि पोक्सो कायद्यातील कलम 12 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2) (व्हीए) नुसार दाखल केला असून हा गुन्हा अनुसूचित जमातीशी संबंधी असल्याने या गुन्ह्याचा तपास शहर उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सीएम यांच्याकडे देण्यात आला आहे. बालिकेला त्रास देणाऱ्या शिक्षकाला अटक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!