विष्णुपूरी प्रकल्पाचा 14 वा दरवाजा उघडला; नागरीकांनी सतर्क राहावे

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात गेल्या 72 तास सुरू असलेल्या पावसाने 2 नोव्हेंबरपर्यंत 101 टक्के पाऊस पाडला आहे. त्यामुळे बऱ्याच शेतीच्या जमीनी खरडल्या गेल्या आहेत. नदी-नाले, ओढे भरून वाहत आहेत. गावात पडणारा पाऊस नदी,नाले ओढ्यांमध्ये समाविष्ट होत नाही. त्यामुळे बॅक वॉटर तयार झाले आहे. त्यामुळे गावा, शहरांमध्ये पाणी साचत आहे. अनेक पुल बंद झाले आहेत. विष्णुपूरी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेड शहरातील धोक्याची पातळी 354 मिटर आहे. आता वाहते पाणी 354 मिटरच्या आसपासच असल्याने गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडण्यासाठी काहीच सेंटीमिटर शिल्लक आहे. प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. परिस्थिती नियंत्रणात आहे असे सांगितले जात आहे. परंतू अनेक जनावरे मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्याने अत्यंत विक्राळ रुप धारण केले आहे.पावसाचे पाणी पाहण्यासाठी धोक्याच्या ठिकाणी जाऊ नका अशी विनंती वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने सुध्दा नागरीकांना करण्यात येत आहे.

गेली 72 तास नांदेड जिल्ह्यात पावसाने थैमान मांडले असून आज पोळ्याचा सण आहे. असे म्हणतात पोळा आणि पाऊस झाला भोळा परंतू आजचे चित्र त्यापेक्षा उलट आहे. पोळा आणि पाऊस झाला सक्रीय असे म्हणावे लागत आहे. गेल्या 24 तासात 76 मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी पडलेल्या पावसाची आज रोजी अपेक्षीत टक्केवारी 101 झाली आहे.

या पावसाने छोटे-छोटे ओढे, नदी, नाले, मोठ्या नद्या भररून वाहत आहेत. त्यामुळे गावात आणि शहरात पडणारे पाणी, नदी, नाले, ओढे यांच्यात समाविष्ट होत नाहीत आणि त्यामुळे बॅक वॉटर तयार झाले आहे आणि ते सखल भागांमध्ये साचले आहे.नांदेड ते मालेगाव जाणारा एक पुल बंद झाला आहे.शहरातील संत दासगणु पुलावरून पाणी वाहत आहे. असाच काहीसा प्रसंग जिल्ह्यातील अनेक पुलांवर घडलेला आहे. सहस्त्रकुंड धबधब्याने विक्राळरुप धारण केले आहे. सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी बरेच लोक जातात परंतू ही जागा सुध्दा आता सध्या धोकादायक आहे. अनेक पुलांवर उभे राहुन सेल्फी काढण्याचा एक छंद अशा वेळी तयार झालेला आहे. परंतू धोक्याच्या ठिकाणी जाऊन फोटो काढतांना, रिल बनवितांना आपला जीव सुध्दा धोक्यात आहे याची जाणिव सुध्दा जनतेने ठेवावी. काही महिन्यापुर्वीच पुण्यातील एका कुटूंबातील सहा जण अशाच फोटो काढण्याच्या नादात पाण्यात वाहुन गेले होते याला विसरु नका. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा जनतेला आवाहन करत आहे की, पावसाचे पाणी पाहण्यासाठी धोकादायक ठिकाणी जाऊ नका आणि आपला जीव धोक्यात घालू नका.

विष्णुपूरी प्रकल्पाचे 14 दरवाजे आता उघडण्यात आले आहे. जवळपास 30 हजार क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदेड शहराची पुरपातळी 354 मिटर आहे. सध्याचे प्रकल्पातून सोडलेले पाणी 354 च्या आसपासच आहे. त्यामुळे एखादा दरवाजा अजून उघडला गेला तर नांदेड शहर सुध्दा पुरग्रस्त होणार आहे. शहरातील बऱ्याच भागांमध्ये झोपडी, घरे आहेत त्या घरांच्या गल्या-गल्यांमधून पाणी वाहत आहे. शहरातील खडकपुरा, वजिराबाद, जुना मोंढा, इतवारा, चौफाळा, वांगी गाव ही ठिकाणे 354 पातळी आल्यावर धोकादायक परिस्थितीत येतात. जनतेने आपला आणि आपल्या शेजाऱ्यांचा विचार करून पाऊस पुर्णपणे कमी होईपर्यंत, विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे बंद होईपर्यंत दक्ष राहावे अशी विनंती वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा वाचकांना करत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!