नांदेड(प्रतिनिधी)-शनिवारच्या मध्यरात्रीपासून पावसाने सुरूवात केली आणि रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप चालूच होती. जिल्ह्यातील अनेक भागातील नदी नाल्याने पुर आल्याने शेतकऱ्यांसह अनेकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शनिवारी मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 26 महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. तर जिल्हाप्रशासनाने नागरीकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतच आपत्ती व्यवस्थापनाही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाला रविवारीही दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदेड शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरीकांना या पाण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली आले आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून सरासरी 60 टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस 136.80 मी.मी. किनवट तालुक्यात झाला आहे. याचबरोबर 103 मी.मी. हिमायतनगर, 96.60 मी.मी.माहूर, 80.60 हदगाव, 66.50 भोकर, 44.70 नांदेड, 36.40 बिलोली, 31.80 लोहा, 29.20 देगलूर, 20.90 कंधार, 58.50 धर्माबाद, 33.70 उमरी अशी नोंद झाली आहे.
विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून एक दरवाजा शनिवारी मध्यरात्रीच उघडण्यात आला आहे तर दुसरा दरवाजा रविवारी दुपारी 4.50 वाजता उघडण्यात आला आहे. जर पाऊस असाच राहिला तर तिसरा दरवाजाही उघडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. गोदावरी नदी काठच्या नागरीकांना सावध राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पाऊस थांबताच नुकसानाचे पंचनामे केले जातील-जिल्हाधिकारी
जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि इतर ठिकाणचे नुकसान झाले आहे. हे सर्व पंचनामे पाऊस थांबताच होतील. नागरीकांनी सतर्क असावे, पुलावरून पाणी वाहत असतांना रस्ते ओलांडू नये, धोकादायक ठिकाणी जावू नये, जिल्हा प्रशासनाचे नुकसाना संदर्भात लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे.