नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गोडाऊनचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातील 60 हजार रुपये किंमतीचे विद्युत साहित्य चोरून नेले आहे. मौजे रिठा ता. भोकर येथे घरफोडून चोरट्यांनी 70 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मामा चौक ते हस्सापूर रस्त्यावर होमगार्ड भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराचे कागदपत्र आणि मोबाईल असा 9 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबला आहे. यासोबत जिल्ह्यात अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
प्रभाकर सोपानराव इंगोले या ठेकेदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरूजी चौक वाडी रोड येथे प्रथमेश्र्वर ईलेक्ट्रीकल्सचे गोडाऊन आहे. दि.24 ऑगस्ट 2024 रोजीचा सायंकाळी 6 ते 25 ऑगस्टच्या सकाळी 10 वाजेदरम्यान त्यांचे हे बंद गोडाऊन फोडून चोरट्यांनी त्यातून 60 हजार रुपये किंमतीचे विद्युत साहित्य चोरून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 425/2024 नुसार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार बोरकर हे करीत आहेत.
रिठ्ठा ता.भोकर येथील शेतकरी माणिका गणपत पल्लेवाड यांनी दिलेल्या तक्रारी नुसार 30 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनतर 1 वाजता ते आपल्या शेतात झोपायला गेले. घरात त्यांची पत्नी व नातवंडे होते. सकाळी 6 वाजता परत आले असतांना कोणी तरी घराच्या गेटवरून आत प्रवेश केला आणि कपाट फोडून त्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे असा 70 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 318/2024 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
30 ऑगस्ट 2024 रोजी मुखेड येथील सतिश प्रकाश आडे हा युवक होमगार्ड पदाच्या भरतीसाठी चाचणी देण्यासाठी आला होता. त्यातील धावण्याची चाचणी मामा चौक ते हस्सापूर रस्त्यावर झाली. त्यावेळी तेथे लावण्यात आलेल्या शामीयान्यात सतिश आडेने आपली बॅग ठेवली. त्या बॅगमध्ये शैक्षणिक कागदपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, मुळगुणपत्रिका यासह मोबाईल् होता. ही बॅगच चोरट्यांनी लांबली आहे. यातील ऐवजाची एकूण किंमत 9 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 788/2024 प्रमाणे दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार शेख जावेद हे करीत आहेत. या चोरींच्या घटनांसह नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुचाकी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.