नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात लोकसभेचे सदस्य खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नेतृत्वात तयार झालेली एक पोकळी भरुन काढत असतांना नांदेड लोकसभा मतदार संघाने, या मतदार संघातील नेतृत्वाने एक वेगळा विचार करण्याची गरज जनतेतून पुढे येत आहे. सर्वसाधारण पणे आजपर्यंतच्या ईतिहासानुसार निधन झालेल्या सदस्याच्या पत्नी, मुलगा, मुलगी यांना राजकीय पक्षांकडून तिकिट दिले जाते.परंतू आज देशात आणि महाराष्ट्रात असलेल्या परिस्थितीला अनुसरुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढवावी अशी चर्चा सुरू झाली आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघातील जतनेच्या दुर्देवाने एक निष्कलंक नेता काळाने हिरावून घेतला. त्यावर कोणीच काही करू शकत नाही. पण त्यांचे निधन झाल्याबरोबर अनेकांनी आपल्या गुडघ्याला बाशिंगे बांधली आणि खलबत्ते सुध्दा सुरू झाली. सर्वसाधारण पणे भारताच्या ईतिहासात ज्या कोणत्याही मतदार संघातील नेत्याचे निधन होते. त्या मतदार संघात त्या नेत्याच्या कुटूंबातील व्यक्तीला राजकीय पक्ष उमदेवार बनवतात आणि तोच निवडूणपण येेतो. खुप काही कमी ठिकाणी याविरुध्द घडलेले आहे. नांदेड लोकसभा मतदार संघात सुध्दा कॉंगे्रसच्यावतीने वसंतराव चव्हाण यांचे सुपूत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाईल. मागे एका साक्षात्कारात खा.वसंतराव चव्हाण म्हणाले होते की, अशोक चव्हाणांची मुलगी आमदारकी लढविण्याची तयारी करत आहे तर वसंत चव्हाणांच्या मुलाला का नको. त्यांचे म्हणणे सुध्दा खरे आहे.
पण सध्या देशात आणि राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीत एक वेगळा विचार समोर येत आहे. नांदेडच्यावतीने, महाराष्ट्राच्या वतीने केंद्राच्या सत्तेत वंचित बहुजनांचा आवाज उठविण्यासाठी कोणी तरी खंबीर नेतृत्व असावे त्यात आजच्या जगात विचारवंतांचा हा विचार आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा नांदेड मतदार संघातून निवडणुक लढवावी. यानंतर सुध्दा प्रश्न असा आहे की, इतर राजकीय मंडळी भारताला जगातील सर्वोत्तम संविधान देणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाला निवडुण देण्यासाठी तयार राहतील काय? आम्ही ऐकलेल्या विचारांना मांंडतांना रवींद्र चव्हाण सुध्दा नेता व्हावेत अशीच आमची पण इच्छा आहे. पण त्यांनी नायगाव विधानसभेची निवडणुक लढवावी आणि आपल्या वडीलांच्या राहिलेल्या कामांना गती द्यावी. ऍड.प्रकाश आंबेडकरांना लोकसभेत निवडुण दिले तर आजच्या परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न संविधान बदलणे, आरक्षण समाप्त करणे याचा विरोध करण्यास धार येईल. लोकसभा निवडणुक 2024 मध्ये ऍड.प्रकाश आंबेडकरांनी उचलेला संविधान बदलाचा मुद्दा कॉंगे्रस आणि इतर विरोधी पक्षांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्यांची लोकसभा सदस्य संख्या 133 पर्यंत पोहचली. पण हा मुद्दा उचलणारे मुळ व्यक्ती ऍड.प्रकाश आंबेडकर यांना हा मुद्दा उचलून काहीच प्राप्त झाले नाही. त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनाला पाहिले असता त्यांना काही मिळविण्याची गरज शिल्लक नाही. त्यांचे आजोबच त्यांच्यासाठी एवढे काही ठेवून गेले आहेत की, ते संपता संपणार नाही. पण प्रकाश आंबेडकरांना नांदेड लोकसभा मतदार संघातून निवडूण देण्यामागे कॉंगे्रस पक्षाचा हात सुध्दा आवश्यक आहे. कारण त्यांचाच मुद्दा उचलून महाराष्ट्रातच नव्हे देशात कॉंगे्रसने लोकसभेच्या अनेक जागा जिंकलेल्या आहेत.
1984 मध्ये ऍड.प्रकाश आंबेडकरांनी नांदेड लोकसभेची निवडणुक लढवलेली आहे. त्यावेळेस सुध्दा ती पोट निवडणुक होती. निवडणुकीचा प्रचार 48 तास अगोदर संपतो तोपर्यंत एक्झीट पोल ऍड.प्रकाश आंबेडकरांच्या हक्कात होते. पण त्या शेवटच्या 48 तासात बुध्दीबळाचा पटावर फिरवल्या गेलेल्या गोट्यांमुळे ऍड.प्रकाश आंबेडकरांचा पराजय झाला होता. गोट्या कशा फिरल्या याची इतंभुत माहिती सुध्दा लिहिता आली असती परंतू त्यामुळे अनेकांची मने दुखावली जाण्याची भिती वाटत आहे. म्हणून गोट्या फिरल्याचा उल्लेख आम्ही टाळला आहे. ऍड.प्रकाश आंबेडकरांनी सुध्दा राजकीय बुध्दीबळाच्या पटावर योग्य खेळी खेळून इतर विरोधी पक्षांसोबत सहयोगाची भावना ठेवत आणि सहयोगाची भावना मागून ही लोकसभेची निवडणुक लढवावी असा सुर नांदेड लोकसभा मतदार संघातून ऐकायला मिळत आहे.