खा.वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड: -नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत श्रध्दांजली अर्पण केली.

नायगाव येथील चव्हाण कुटुंबीयांच्या स्मशानभूमीमध्ये या भूमीपूत्राला संपूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

२६ ऑगस्टला हैद्राबाद येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सोमवारी त्यांचे पार्थिव नायगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित वाड्यामध्ये अंत दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांचे मूळ गाव असणाऱ्या नायगाव येथे हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत अंतीम संस्कार करण्यात आले.चव्हाण कुटुंबांच्या मंदिर परिसरातील स्मशानभूमीत त्यांचे चिरंजिव रवींद्र चव्हाण व रंजीत चव्हाण यांनी भडाग्नी दिला. तत्पूर्वी, त्यांना पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. यावेळी त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता.

नायगाव येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण राज्यातून तसेच तेलंगाना व कर्नाटक मधील स्नेही मोठ्या संख्येने पोहोचले होते.तर देशातील व राज्यातील राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पालकमंत्री गिरीश महाजन,राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, लातूरचे खासदार डाॅ.शिवाजी काळगे, धुळेच्या खासदार डॉ.शोभा बच्छाव, जालणाचे खासदार कल्याण काळे, परभणीचे खासदार संजय जाधव, खा. रजनीताई पाटील, खा.डॉ.अजित गोपछडे,माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात,आ.अमीत देशमुख,आमदार सर्वश्री शामसुंदर शिंदे, राजेश पवार, माधवराव जवळगावकर, बालाजी कल्याणकर, डॉ. तुषार राठोड,धीरज देशमुख,प्रज्ञा सातव ,विक्रम काळे, जितेश अंतापूरकर, मोहन अण्णा हंबर्डे, मेघणाताई बोर्डीकर,

माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, सुभाष वानखेडे, माजी केंद्रीय राज्य मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री कमलकिशोर कदम ,यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभा झाली.

 

*वसंतराव चव्हाण यांचा परिचय*

खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या वडीलाचे नाव कै. बळवंतराव अमृतराव चव्हाण होते. त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण हे देखील विधानसभा व विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यांचाच राजकीय वारसा वसंतरावांनी पुढे सुरू ठेवला. वसंतरावांचा जन्म दिनांक 15 ऑगस्ट 1954 रोजी झाला होता. त्यांचे जन्मस्थळ नांदेड जिल्हयातील नायगांव (बा.) आहे. त्यांचे शिक्षण बीकॉम (दुसरे वर्ष) असे होते.

स्व. वसंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशी केली आहे. सन 1978 ते 2002 पर्यत सलग 24 वर्ष ते नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते. बिलोली सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते. सन 1990-95 या काळात जिल्हा परिषद सदस्य नांदेड. सन 2002 मध्ये जिल्हा परिषदेला दुसऱ्यांदा निवड झाली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे नांदेड, सन 2002-2008 विधान परिषद सदस्य होते. 2009-2014 या काळात ते राज्याच्या विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य (अपक्ष) होते. त्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य म्हणूनही पद भूषविले. संसदीय कामकाज पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी युरोपचा अभ्यास दौरा केला. पुन्हा एकदा 2014-2019 या काळात काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते निवडून आले. सदस्य अंदाज समिती महाराष्ट्र राज्य. सन 2016-2022 सभापती कृ.ऊ.बा समिती नायगांव, सन 2021-2023 चेअरमन, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली आणि 29 फेब्रुवारी 2024 पासून मुख्य समन्वयक नांदेड ग्रामीण कॉग्रेसची जबाबदारी त्यांनी घेतली. नायगाव तालुका निर्मितीचे ते शिल्पकार आहेत. 4 जून 2024 पासून ते कॉग्रेस पक्षाकडून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. खासदार म्हणून त्यांचे कामकाज नुकतेच सुरू झाले होते. राजकीय कारकीर्दीसोबतच त्यांचे सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यातही खूप मोठा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!