नांदेड(प्रतिनिधी)-दीड वर्षापुर्वी नाईक कॉलेज सिडको समोर राजू प्रदीप तरपे(25) या युवकाचा खून करणाऱ्या एका फरार आरोपीला इतवारा उपविभागीय विशेष गुन्हे पथक आणि वजिराबाद गुन्हे पथक यांनी संयुक्त कार्यवाही करून पकडले आहे. या प्रकरणात मकोका कायद्याचा समावेश आहे.
दीड वर्षापुर्वी सिडको मधील नाईक कॉलेजसमोर युवकांच्या एका गटाने राजू प्रदीप तरपे या युवकाचा खून केला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा 122/2023 दाखल करण्यात आला होता. पुढे या प्रकरणात मकोका कायद्या जोडण्यात आला. या प्रकरणातील 9 मारेकऱ्यांना पोलीसांनी अटक केली होती. पण त्यातील एक किरण सुरेश मोरे (28) रा.धनेगाव नांदेड हा मागील दीड वर्षापासून फरारच होता. उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा सुशिलकुमार नायक यांच्या नेतृत्वातील विशेष गुन्हे शोध पथक आणि वजिराबाद पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक यांनी संयुक्तरित्या फरार असलेला आरोपी किरण सुरेश मोरे (28) यास ताब्यात घेतले. त्याची विचारणा केली असता त्याने मी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईक कॉलेजसमोर आपल्या सहकाऱ्यांसोबत राजू प्रदीप तरपेचा खून केल्याची कुबली दिली. किरण मोरेला पकडणाऱ्या पोलीस पथकाने त्याची रवानगी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक सी.एम.किरितीका ह्या करीत आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे, पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, संतोष बेल्लुरोड, रमेश सुर्यवंशी, बालाजी कदम यांचे फरार आरोपीला पकडल्याप्रकरणी कौतुक केले आहे.