• केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांच्या हस्ते पाच तख्त साहिबांची विशेष रेल्वेला हिरवी झेंडी
नांदेड :- नांदेड हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंघजी यांचे वास्तव्य असलेली पावन भुमी असून या भुमीत त्यांनी सर्व जगाला मानवतेची शिकवण दिली आहे. अशा या पावनभूमीतील नांदेडचे रेल्वे स्टेशन हे येत्या कालावधीत सर्व सोयीनी सुविधांनी युक्त असलेले देशातील सर्वोत्तम रेल्वे स्टेशन करण्यात येईल,असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी केले.
गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 25 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यत पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आज हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशन येथून दुपारी 12.30 वाजता या यात्रेचा प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी या विशेष ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
यावेळी आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, संत बाबा कुलवंत सिंघजी, समुह पंच प्यारे साहिबान, संत बाबा बलविंदर सिंघजी, आयोजक रविंद्रसिंघ बुंगई, दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे आदींची उपस्थिती होती.
नांदेड रेल्वे स्टेशन येथून आज पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वेला रवाना करण्यात आले. या यात्रेत 1 हजार 300 भाविकांचा समावेश असून ही यात्रा पटना, दिल्ली, अनंतसाहिब फतेहगडसाहिब सरहंद, दमदमासाहिब भटींडा, दरबारसाहिब अमृतसर येथे पोहोचणार आहे. तसेच ही यात्रा 6 सप्टेंबर रोजी नांदेडला वापस पोहोचणार आहे. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी लंगर, वाहनांची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था केली आहे.