नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्राची महायुती सरकार महिलांंच्या संदर्भाने कधीच संवेदनशिल नव्हती. तसेच महाराष्ट्रात घडलेल्या बालिकांवरील अत्याचार, याशिवाय विविध घटनांना अनुसरुन कॉंगे्रस पक्षाने उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे अशी माहिती अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंगे्रसच्या प्रवक्त्या अमृतकौर गिल यांनी दिली.
नांदेडच्या कॉंग्रेस पक्षाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अमृतकौर गिल या बोलत होत्या.यावेळी कॉंगे्रस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, मुनतजिबोद्दीन, सत्यपाल सावंत,डॉ. रेखा चव्हाण, बापूसाहेब देशमुख यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना अमृतकौर गिल म्हणाल्या. 12 आणि 13 ऑगस्टला घडलेल्या घटनेमध्ये 17 तारखेला गुन्हा दाखल केला जातो. एका गर्भवती आईला 12 तास गुन्हा नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात बसवून घेतले जाते. मग राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय करत आहेत. बदलापूरच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही नाही, बालिकांना वॉरुमपर्यंत नेण्यासाठी महिला नाही, त्यांच्या वयाप्रमाणे त्यांची देखरेख करण्यासाठी महिला नाही अशा परिस्थितीत त्या शाळेच्या चुकीला पांघरुन घालण्यासाठी महायुती सरकार का प्रयत्न करत आहे हे कळत नाही. त्या शाळेतील दोन सदस्य तुषार आपटे आणि नंदकिशोर पाठकर हे भारतीय जनता पार्टीशी जुळलेले आहेत त्यामुळे सरकार त्या शाळेच्या एवढ्या गंभीर घटनेला कानाडोळा करत आहे. बदलापुरच्या शाळेत वृत्तांकनासाठी गेलेल्या एका महिला पत्रकाराला भारतीय जनता पार्टीचा आमदार विचारतो की, तु एवढे का बोलत आहेस, तुझ्यावर बलात्कार झाला आहे काय? यापेक्षा वाईट वागणूक आणि ति सुध्दा महिलांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच दिली जावू शकते असे अमृतकौर गिल म्हणाल्या.
पोलीस गुन्हा दाखल करत नाही म्हणून बालिकांचे पालक आणि जनता रस्त्यावर उतरली. त्यांनी चक्का जाम केला, रेल्वे जाम केल्या त्यावेळी आंदोलकांवर शासनाने लाठी मार केला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, आंदोलकांना दोरीने बांधून धिंड काढली आणि आज 72 जण तुरूंगात आहेत. हे प्रकार करणाऱ्या शासनाला थोडी सुध्दा लाच वाटली नाही काय? भारतीय लोकशाहीमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हा एक हक्क आहे. शासनाने गुन्हा दाखल केला असता तर नागरीक रस्त्यावर का उतरले असते असा प्रश्न गिल यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात प्रत्येक तासाला एक बलात्कार होतो. 20 हजार पेक्षा जास्त बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे प्रलंबित आहेत, 47 हजार खटले महिलांविरुध्द गुन्ह्याचे आहेत. महाराष्ट्रातील सरकार ही गुन्हेगारांतर्फे उभे राहिली या विरोधात उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याचे अमृतकौर गिल म्हणाल्या.