मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नांदेडमध्ये आतापर्यंत १०२४ जणांची निवड

नांदेड :-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण 5016 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी एकूण 98 आस्थापनाने 1024 उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले आहेत.त्यापैकी 134 उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले असून इतर उमेदवार रुजू होणे बाबतची प्रक्रिया सुरू आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून  उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय तथा निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी इयत्ता बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारक प्रशिक्षणार्थींना 8 हजार रुपये आणि पदवीधर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे.
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंड ामध्ये मंजूर पदाच्या 5 टक्के किंवा किमान एक उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.
लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, आणि विविध आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी. किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विभागामार्फत विद्यावेतन दिले जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वरील वेबपोर्टलला भेट देवून योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्राच्या सहाय्यक संचालक रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!