नांदेड(प्रतिनिधी)-सत्तांतर झाल्यानंतर बरेच बदल घडत असतात. नांदेड जिल्ह्यात पोलीस उपमहानिरिक्षक नवीन, पोलीस अधिक्षक नवीन, अपर पोलीस अधिक्षक नवीन या सत्तांतरानंतर स्थानिक गुन्हा शाखेतील डॉक्टर ऑपरेशन करतांना कोणाची परवानगी घेणार आणि कोण परवानगी देणार या दोन प्रश्नांची उत्तरे मिळणे अवघड आहे. अशा परिस्थितीत अगोदरपासूनच आयसीयुमध्ये ठेवलेल्या रुग्णांचे काय होईल हा प्रश्न विद्यावाचस्पती मिळविण्यासाठी योग्य विषय होईल.
नांदेड जिल्हा पोलीस दलात ऑगस्ट महिन्यात तीन मोठे सत्तांतर झाले. पोलीस उपमहानिरिक्षक पदावर शहाजी उमाप यांची नियुक्ती झाली. पोलीस अधिक्षक पदावर अबिनाशकुमार आले. त्यांच्यानंतर अपर पोलीस अधिक्षक पदावर सुरज गुरव यांची वर्णी लागली. या सत्तांतरानंतर सर्व प्रथम पोलीस महानिरिक्षकांनी नांदेडच नव्हे तर त्यांच्या परिक्षेत्रातील चारही जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे अवैध धंदे नेस्तनाबुत करण्याच्या सुचना केल्या होत्या. तरी पण 14 ऑगस्ट रोजी पत्र पाठवून आपल्या दिलेल्या सुचनांसाठी स्मरण करून दिले. त्यानंतर चारही जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी विशेष पथके स्थापन करून अवैध धंद्यांच्या उच्चाटनासाठी पाऊले उचलली आहेत.
या सर्व बदलामध्ये मात्र कोणाच्या तोंडी आदेशाने डॉक्टर स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत आहे हे तर उघड झालेच नाही. पण आजही डॉक्टर साहेब स्थानिक गुन्हा शाखेतच कार्यरत आहेत. एका जुन्या प्रकरणातील पोलीस अंमलदार सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेत पुन्हा हजर झालेला आहे. या लोकांना का सोडावी वाटत नसेल स्थानिक गुन्हे शाखा. काहींना तर फक्त भिंत बदलून नियुक्ती मिळाली आहे. ते करणारच तेच जे अगोदर करत होते. अशा परिस्थितीत पोलीस उपमहानिरिक्षकांच्या आदेशाने वाळु गाड्यांवर झालेली कार्यवाही आता वाळू सुध्दा बंद पडेल अशा परिस्थितीत आलेली आहे. यात कोणता मार्ग काढता येतो काय? अनेक जण प्रयत्न करतील पण मार्ग काढण्याचे रस्ते पोलीस उपमहानिरिक्षक आणि पोलीस अधिक्षक यांच्याकडेच आहेत आणि त्यांनी ते मार्ग पुर्णपणे अवरुध्द केलेले आहेत.
या सर्व प्रकरणात चिंता डॉक्टर साहेबांची वाटते. कारण ऑपरेशन करण्यामध्ये सर्वात माहिर व्यक्तीमत्व अशी त्यांची ख्याती आहे. आता सर्व मार्ग अवरुध्द असतांना डॉक्टरांचे ऑपरेशन थेटर(ओटी) बंद पडेल. त्या परिस्थितीत डॉक्टर साहेब काय करतील हा प्रश्न समोर येत आहे. डॉक्टर साहेबांनी सुध्दा आता ऑपरेशन थेटरला(ओटी) विसरण्याची वेळ आलेली आहे. नाही तर ओटीमध्ये असणाऱ्या विविध विद्युत उपकरणांमुळे शॉर्ट सर्कीट होण्याची वेळ आलेली आहे.