नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी एका चोरट्याला पकडून त्याच्याकडील चोरीचे 16 मोबाईल, एक चोरीची दुचाकी आणि खंजीर असे घातक हत्यार जप्त केले आहेत.
रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक परिसरात लोकांच्या नजरा चुकवून त्यांचे मोबाईल काढून घेण्याचे प्रकार वाढल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी त्यावर लक्ष केंद्रीत केले. चोरी केलेले मोबाईल हा व्यक्ती विकण्याच्या तयारीत असल्याचे माहिती मिळाल्याने वजिराबाद पोलीसांनी किरण उर्फ छोट्या विश्र्वास तुळसे (22) रा.लिंबगाव यास पकडले.त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची एक चोरीची दुचाकी, 16 चोरीचे मोबाईल आणि एक खंजीर पोलीसांनी जप्त केले आहे. चोरलेल्या मोबाईलची किंमत 2 लाख 33 हजार रुपये आहे. दुचाकीची किंमत 30 हजार रुपये असा एकूण 2 लाख 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार मनोज परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किरण उर्फ छोट्या तुळसे विरुध्द भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे आणि प्रदीप कांबळे हे करत आहेत. याच चोरट्याने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुध्दा मोबाईल चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. सध्या तो नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी.वटाणे, पोलीस अंमलदार मनोज परदेशी, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, बालाजी कदम, रमेश सुर्यवंशी, शेख इमरान, भाऊसाहेब राठोड आणि अंकुश पवार यांचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.