राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जन्मजात बहिरेपणा असलेल्या 70 बालकांना श्रवणयंत्र वाटप 

नांदेड  :-  जन्मजात बहिरेपणाचा आजार असलेल्या व श्रवण शक्ती कमी असलेल्या 116 बालकांची तपासणी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे यशश्री कान नाक घसा हॉस्पिटल मिरज सांगली येथील डॉ. गीता कदम व  त्यांचे सहकारी  यांच्यामार्फत सोमवार 5 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यापैकी 6 बालकांना  कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले असून त्याची  शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उर्वरित कमी प्रमाणात ऐकू येणाऱ्या  70 बालकांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहे.

त्यामुळे बालकांची श्रवण शक्ती वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

या शिबिरासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. विद्या झिने, डॉ.हनुत जधव, डॉ.विजय पवार यांच्या नेतृत्त्वाखाली RBSK जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, DEIC व्यवस्थापक विठ्ठल तावडे, ऑडिओलॉजिस्ट श्रीमती श्वेता शिंदे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेतले.

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शुन्य ते 18 या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजाराचे निदान व उपचार करण्यात येतात. जन्मजात बहिरेपण तपासणी, हृदयरोग तपासणी (2D ECHO), नेत्ररोग, आकडी/फेफरे यांची मोठ्या प्रमाणावर शिबिर आयोजीत करून निदान  आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येते.

जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर  कानाच्या शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो.  तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत शुन्य ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळलयास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!