नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर नाका परिसरातील पाच युवक ज्यांचे वय 18 ते 21 वर्ष वयोगटातील आहेत. ते झरी येथील गणेश विसर्जन खदानीमध्ये पोहण्यासाठी गेले असतांना त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोदावरी जीवरक्षक दलाने या प्रकरणात मदत करून मरण पावलेल्या युवकांची प्रेते खदानीबाहेर काढली आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार हे सुध्दा घटनास्थळी गेले होते.
देगलूर नाका परिसरात राहणारे शेख फुजाईल, मुजम्मिल काझी, आफान, सय्यद सिद्दीकी आणि मोहम्मद फयजान हे 18 ते 21 वयोगटातील पाच युवक विद्यापीठाच्या शेजारी असलेल्या झरी येथील गणेश विसर्जन खदानीमध्ये पोहण्यासाठी गेले असतांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि या पाच पैकी मोहम्मद फयजान हा युवक बचावला आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, सोनखडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने आणि अनेक पोलीस अंमलदार या ठिकाणी पोहचले. नांदेड येथील गोदावरी जीव रक्षक दलाचे सय्यद नुर, शेख हबीब, शेख सलीम, सय्यद वखार, कालीदास खिल्लारे यांनी खदानीमध्ये उतरून मरण पावलेल्या चार युवकांचे प्रेत बाहेर काढले. या संदर्भाने सोनखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे.