मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; पोर्टलवर 4.73 लक्ष नोंदी

 

 *नांदेड जिल्ह्यात 56% अर्जांची छाननी पूर्ण* 

नांदेड: -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण यंत्रणा सध्या अर्ज ऑनलाईन करणे व मंजुरी देणे या कामात व्यस्त असून जिल्ह्यातील आत्तापर्यंत दाखल 4 लाख 73 हजार 123 अर्जापैकी दोन लक्ष 68 हजार 955 अर्ज तालुका समितीने मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले आहे. थोडक्यात 56 टक्क्यांपर्यंत अर्जाना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे.

 

दरमहा, दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये महिला भगिनींना थेट बँक खात्यात देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकीकडे अर्जदारांची लगबग सुरू असतानाच प्रशासन हे सर्व अर्ज नारी शक्ती दूत पोर्टलवर अपलोड करण्यामध्ये व परिपूर्ण प्रस्तावाना मंजुरी देण्यात व्यस्त झाले आहे.अर्ज अचूक अपलोड करण्यात यावे. याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

नांदेड जिल्हयाची पुढे आलेली आकडेवारी बघता आतापर्यंत 56% अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. दाखल केलेल्या अर्जांपैकी 2 लक्ष 68 हजार 955 अर्जाना तालुकास्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. पोर्टलवर अपलोड करताना त्रुटी आल्यामुळे नामंजूर झालेल्या अर्जाची संख्या फक्त 371 आहे. आता या अर्जाना जिल्हास्तरीय समिती तपासणी नंतर मान्यता देणार आहे.

 

ऑनलाइन ऑफलाइन अर्ज गोळा करण्यामध्ये व पोर्टलवर भरण्यामध्ये सर्वात प्रभावीपणे मुखेड तालुक्याने काम केले आहे. या तालुक्यात ऑफलाइन व ऑनलाईन एकूण 34 हजार 544 अर्ज दाखल झाले. यापैकी 34 हजार 202 अर्ज अपलोड करून तालुका समितीने मान्य केले आहे. ही टक्केवारी 99% आहे. जिल्ह्याची सरासरी टक्केवारी 56 असताना मुखेड तालुक्याने अतिशय उत्कृष्टपणे काम केले असल्याने प्रशासनाने टिम मुखेडचे कौतुक केले आहे.

 

सर्वाधिक अर्ज नांदेड तालुक्यामध्ये दाखल झाले आहेत. ही संख्या 77 हजारावर आहे. तर सर्वात कमी अर्ज धर्माबाद तालुक्यामध्ये आहे ही संख्या केवळ 12 हजार आहे.

 

दरम्यान, पात्र ठरलेले 56% अर्ज प्राथमिक तपासणीनंतर तालुका स्तरीय समितीला योग्य वाटत असले तरी या संदर्भातील अंतीम निर्णय जिल्हास्तरीय समिती घेणार आहे.

 

जिल्ह्यातील ज्या पात्र महिला या योजनेसाठी लाभार्थी ठरू शकतात त्या सर्व महिलांनी अर्ज दाखल करावे. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असली तरी ही प्रक्रिया निरंतर सुरू असेल. तथापि, 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करणाऱ्यांना जुलै व ऑगस्ट महिन्यांचे पैसे रक्षाबंधनला मिळणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने अतिशय गतीने ऑनलाइन पद्धतीने अर्ज अपलोड करणे सुरू केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!