नांदेड:- केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो,जिल्हा सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवे फौजदारी कायदे- 2023(New Criminal Law-2023) या विषयावर जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेडच्या परिसरात 7 व 8 ऑगस्ट 2024 रोजी दोन दिवशीय मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व साक्ष्य अधिनियम 2023 या कायद्याविषयी माहिती मल्टिमिडीया व एलईडी वॉलच्या माध्यमातून संक्षिप्त स्वरुपात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
हे नवीन कायदे देशात 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहेत, हे कायदे पुर्वीच्या भारतीय दंड संहिता(आयपीसी) व फौजदारी प्रक्रीया संहिता (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेणार आहेत.या नवीन कायद्यामध्ये काही कलम हटविण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत. या कायद्यामुळे पोलीस,वकील, न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपध्दतीत मोठा बदल होणार आहे.
या नवीन भारतीय जदारी कायदयाची माहिती सर्व सामान्य जनता, युवक- विद्यार्थी, वकील- पक्षकार आणि पोलीस प्रशासनास व्हावी या दृष्टीकोनातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.एम. कौसमकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती डी. एम जज, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खूले असणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.