नांदेड(प्रतिनिधी)-बनावट रासायनिक खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लोहा येथील एका व्यापाऱ्याविरुध्द कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रक लोहा यांनी विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोहा येथील कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रक शैलेश हरी वावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.24 जुलै रोजी पोखरी ता.लोहा येथील एका शेतकऱ्याने इफ्को कंपनीच्या भेसळ खत विक्रीबाबत तक्रार केली. त्यानंतर मी व तक्रारदार शेतकरी संगम कृषी सेवा केंद्र लोहा येथे तपासणीसाठी गेलो. रासायनिक खत खरेदी आणि विक्रीसाठी आवश्यक असलेला अभिलेख त्यांनी उपलब्ध ठेवला नव्हता. त्यानंतर त्यांचा रासायनिक खतांचा साठा तपासला तेंव्हा त्याच्यात बऱ्याच तफावती दिसून आल्या. रासायनिक खत तपासणीसाठी रासायनिक खते प्रयोग शाळा येथे तपासणीसाठी पाठविले. या ठिकाणावरून एकूण विविध बनावाट खतांचा 36 हजार 862 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर 3 जुलै रोजी इफ्को कंपनीने त्याठिकाणी भेट दिली आणि संगम कृषी सेवा केंद्रात असलेला साठा आमचा नसल्याचा लेखी पुरावा दिला.
त्यानुसार संगम कृषी सेवा केंद्राचे मालक रामदास गंगाधर बामणे रा.रामतिर्थ ता.लोहा यांच्याविरुध्द लोहा पोलीसांनी 1985 चा रासायनिक खते नियंत्रक आदेशातील कलमे 2, 5, 6, 7, 8, 19(सी) 21, 35 तसेच अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 मधील कलम 3(2)(ए), 3(2)(डी), 7 आणि 9 तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम 318(2), 336(2), 336(3) प्रमाणे गुन्हा क्रमांक 267/2024 दाखल केला आहे. या गुन्हाचा तपास सुरू आहे.