नांदेड(प्रतिनिधी)-महिला लिपीक सांगते मनपा आयुक्तांनी सर्व कामे बंद करून फक्त लाडक्या बहिण योजनेचे काम करायचे आहे. याबाबत मनपा आयुक्त सांगतात मला काही माहित नाही. याबद्दल डॉ.बिसेन यांच्याशी संपर्क साधा. पण डॉ.बिसेन यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. मग सर्व सामान्य जनतेची कामे अशीच चालणार काय? ज्या महिलेकडे जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याचे काम आहे त्या आपल्या खुर्चीवर न बसता दुसऱ्या टेबलवर बसून आयुक्त साहेबांचे नाव सांगून काम करण्यास नकार देत असल्याचा अजब प्रकार महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 3 शिवाजीनगर येथे आज दिसला.
काल दि.31 जुलै रोजी एक नागरीक आपल्या नातूचे जन्म प्रमाणपत्र मिळावे म्हणून क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 3 येथे सकाळी 11 वाजता गेला होता. त्याठिकाणी जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देण्याचे काम करणाऱ्या महिला लिपीक लग्नात गेल्या आहेत असे सांगण्यात आले. त्यामुळे तो नागरीक परत आला. लग्नात जाण्यासाठी सुट्टी नाही, कामावरही हजर नाही आणि लग्न एन्जॉय केले जात आहे असा प्रकार महानगरपालिकेत घडत आहे.
त्यानंतर आज 1 ऑगस्ट रोजी पुन्हा हा नागरीक क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 3 शिवाजीनगर येथे सकाळी 11 वाजता गेला असता त्या महिला स्वत:च्या टेबलवर बसलेल्या नव्हत्याच तर त्या दुसऱ्या टेबलवर बसलेल्या होत्या आणि मोबाईलमध्ये खेळत होत्या. आपल्या अर्ज स्विकारण्याची विनंती नागरीकाने केल्यानंतर त्यांनी सांगितले की, आयुक्त साहेबांनी सगळे काम बंद करून फक्त लाडक्या बहिण योजनेचे काम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अर्ज घेणार नाही. त्या ठिकाणी एकही लाडकी बहिण नव्हती. महिला लिपीक तर मोबाईलमध्ये गुंग होत्या.याचवेळी त्या ठिकाणी इतर काही नागरीक आले होते. त्यांना विवाह प्रमाणपत्र घ्यायचे होते. त्यांचाही अर्ज याच कारणावरून महिला लिपीकांनी अस्विकार केला.
लाडक्या बहिण योजनेचे काम करायला नागरीकांचा काही आक्षेप असू शकत नाही. परंतू जी दररोजची कामे आहेत. ती बंद करता येतात काय? हा प्रश्न आता नागरीकांना पडतो आहे. सोबतच या संदर्भाने मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना महिलेने बोललेल्या शब्दांबद्दल विचारणा केली असता याबद्दल मला काही माहित नाही तुम्ही डॉ.बिसेन यांच्याशी बोला असे सांगितले. डॉ.बिसेन यांना दुरध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे हे आयएएस अधिकारी आहेत. राज्यातील सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांना लाडक्या बहिण योजनेवर प्रामुख्याने काम करणे ही त्यांची मजबुरी असू शकते. परंतू सर्वसामान्य नागरीकांची कामे करायची नाहीत असे त्यांना म्हणता येईल काय? महिला लिपीक बोलते त्या शब्दांना त्यांनी नकार दिला. म्हणजे महिला लिपीक खोटे बोलते आहे. मग खोटे बोलणाऱ्यांवर कार्यवाही करणे सुध्दा मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांचेच काम आहे. जनतेने या संदर्भाने पेटून उठण्याची गरज आहे.