दोन ऑगस्ट रोजी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव महासभा; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 

नांदेड, (प्रतिनिधी )-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 2 ऑगस्ट रोजी नांदेड येथे आरक्षण बचाव महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 25 जुलै रोजी मुंबई येथील चैत्यभूमी येथून ही यात्रा सुरुवात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावरून महाराष्ट्रात अशांततेचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्रातील समाजा समाजात विष पेरण्याचं काम काही प्रस्थापित राजकारण्यांकडून होत आहे. त्याचबरोबर आरक्षणाच्या संदर्भाने दिशाभूल करण्याचे षड्यंत्र ही सुरू आहे. या धर्तीवर महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित व्हावी , ओबीसीचे आरक्षण वाचले पाहिजे, एससी, एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी, एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे, ओबीसी, एससी आणि एसटीला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे,

विधानसभा निवडणुकीत शंभरहून अधिक आमदार निवडून आणणे

त्याचबरोबर 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत या मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे राज्यभर आरक्षण बचाव यात्रा काढत आहेत. ही यात्रा नांदेड जिल्ह्यात दिनांक 2 ऑगस्ट2004 रोजी तीर्थक्षेत्र माळेगाव येथे पोहोचणार आहे. लांडगेवाडी, माळाकोळी, खेडकरवाडी, लोहा, सोनखेड, डॉ. आंबेडकर चौक, माता रमाई आंबेडकर चौक, जुना मोंढा टॉवर या मार्गाने निघून सायंकाळी पाच वाजता नवा मोंढा परिसरात असलेल्या आरक्षण बचाव महासभेच्या ठिकाणी पोहोचणार आहे. या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला राज्याच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व ओबीसी नेत्यांची उपस्थिती असणार आहे. एकूणच नांदेड जिल्ह्यातील सर्वच भागात या आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली असून नागरिकांचा यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. जागोजागी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. या संपूर्ण यात्रेदरम्यान व सभेला नांदेड जिल्ह्यातील मतदारांनी, ओबीसी बांधवांनी त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!