नांदेड(प्रतिनिधी)-86 हजारांची लाच घेणाऱ्या हदगाव येथील दुय्यम निबंधकाला अटक झाल्यानंतर घेतलेली लाच सांभाळणाऱ्या दोन मुद्रांक विक्रेत्यांना अटक केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ.आर.एम.शिंदे यांनी त्या दोघांना 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
13 जुलै रोजी नोंदणी करून देण्यासाठी त्याची कायदेशीर फिस व लाच अशी एकूण 1 लाख 99 हजार रक्कम मागणाऱ्या हदगाव येथील दुय्यम निबंधक बालाजी शंकर उत्तरवार (56) यास न्यायालयाने दोन वेळा पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांना न्यायालयनी कोठडीत पाठविण्यात आले होते. या प्रकरणात बालाजी उत्तरवारच्या सांगण्यावरून तक्रारदाराने ती लाच समीऊल्ला उर्फ समी खान अजमत उल्ला यांच्याकडे देण्यास सांगितली. त्याने घेतलेली लाच दुसरा व्यक्ती शेख अबुबकर उर्फ बाबूभाई करीम सिद्दीकी याच्याकडे दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक प्रिती जाधव यांच्याकडे होता.
प्रिती जाधव यांनी फरार असलेल्या समीउल्ला खान आणि शेख अबुबकर यांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी पोलीस कोठडी मिळाल्यानंतच तपास योग्य होवू शकतो हे सांगितले. समीउल्ला खान आणि शेख अबुबकरच्यावतीने दुसऱ्या पिढीतील वकील ऍड.मनीष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी बाजू मांडली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश शिंदे यांनी लाच प्रकरणातील शेख आणि खान या दोघांना 31 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.