अध्यक्षपदी डॉ.काब्दे तर उपाध्यक्षपदी सीए प्रविण पाटील, सचिवपदी प्रा.श्यामल पत्की
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी कार्यकारिणीच्या झालेल्या निवडणुकीत माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वातील पॅनलने 9 पैकी 9 जागा जिंकुन दणदणीत विजय मिळविला आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.काब्दे यांची तर उपाध्यक्षपदी सीए डॉ.प्रविण पाटील, सचिव प्रा.सौ.श्यामल पत्की, सहसचिव ऍड.प्रफुल्ल अग्रवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र, मराठवाडा आणि नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात सत्तर वर्षांहून अधिक काळ नावलौकीक अढळ ठेवणार्या व भारतीय स्वातंत्र्य आंदोलन व हैद्राबाद मुक्ती संग्राातील स्वातंत्रता सेनानी प.पु.स्वामी रामानंद तिर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीची निवडणूक शनिवारी पार पडली. या निवडणुकीत माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वातील 84 ते 24 वयोगटातील 9 पैकी 9 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे. शिक्षक मतदारसंघातील 4 पैकी 3 जागा बिनविरोध निवडून आणण्यात नवीन कार्यकारिणीला यश मिळाले आहे. शनिवार दि.27 रोजी या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी मतमोजनी पार पडली. यात डॉ.काब्दे गटाचे सी.ए. प्रवीण पाटील (68), डॉ.उमेश भालेराव, (67) डॉ.व्यंकटेश काब्दे (66), श्यामल पत्की (66), शांभवी साले (63) नौनिहालसिंघ जाहगिरदार (62), ऍड,सी.बी.दागडीया (57), प्रफुल्ल अग्रवाल (56), ऍड.प्रदीप नागापूरकर (55), अशी मते घेवून निवडून आले आहेत. तर विरोधी उमेदवार ऍड.चैतन्यबापू देशमुख यांना सर्वाधिक (50) मते मिळाली आहेत. त्यांच्या अन्य उमेदवारांना 50 पेक्षा कमी मते मिळाली आहेत. मागील निवडणूकीत तीन जागांवर विजय मिळविणार्या उमेदवारांना यंदाच्या निवडणुकीत डॉ. काब्दे गटाने व्हाईट वॉश देत 9 च्या 9 जागा जिंकल्या आहेत. तर सायन्स कॉलेज वरिष्ठ शिक्षक मतदारसंघातून ए.टी.शिंदे हे तर पीपल्स कॉलेज ज्युनियर शिक्षक मतदारसंघातून विलास वडजे हे विजयी झाले आहेत. यापूर्वीच सायन्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य एकनाथ खिल्लारे व पीपल्स महाविद्यालयाच्या शिक्षक मतदारसंघातून प्रा.यशपाल भिंगे यांची तर पीपल्स हायस्कूल शिक्षक मतदारसंघातून राहुल गोरे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली होती. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत डॉ.काब्दे गटाने बाजी मारल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोविंद मुंदडा यांनी तर प्रभारी प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, प्राचार्य आर.एम.जाधव, नितीन सेलमोकर, राहुल गवारे, गौतम वाघमारे, रोहीदास आडे यांनी सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले.