नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पुर्णपणे मोफत वीज पुरवली जाईल अशी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 महाराष्ट्र शासनाने अंमलात आणली आहे. उद्योग, उर्जा, कामगार व खनीकर्म विभाग येथील अवर उपसचिव नारायण कऱ्हाड यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
मागच्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना वीज पुरवठा योग्य प्रकारे होत नाही याबाबतच्या अनेक चर्चा झाल्या. शेतकऱ्यांनी या संदर्भाने आंदोलने केली. पण शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही. पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात 28जून 2024 रोजी राज्याचे वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजनेची घोषणा केली. या योजनूतून राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्तीमध्ये पर्यंतच्या शेती पंपांना पुर्णत: वीज मोफत पुरवली जाईल. याकरीता 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सदर योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबवली जाणार आहे. मात्र तिन वर्षाच्या कालावधीन सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजनाचा राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल. राज्यातील 7.5 अश्वशक्तीपर्यंत शेती पंपांचा भार मंजुर असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेसाठी लाभार्थी आहेत. हजारो कोटींची वीज सवलत जाहीर करण्यात आली आहे. हा शासन निर्णय राज्य शासनाने संकेतांक क्रमांक 202407251258409810 नुसार संकेतस्थळावर सुध्दा प्रसिध्द केला आहे.