नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड महानगरपालिकेने आपल्या प्रशंसेचे कितीही पुल बांधले तरी ते पुल किती तकलादू आहेत हे काल रेल्वे स्थानक ते बस स्थानककडे जाणाऱ्या रस्त्यावर एक एसटी बस नालीत फसल्यानंतर समोर आले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये मागील दोन वर्षांपासून प्रशासन आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त हे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत मालकच आहेत. एखाद्या व्यक्तीकडे छोटीशी चुक झाली तरी कायद्यावर बोट ठेवून त्याची वाट लावण्यामध्ये नांदेडच्या मनपा आयुक्तांनी सुध्दा कधी कमतरता ठेवलेली नाही. परंतू त्यांची जबाबदारी त्यांनी कधीच पुर्ण केलेली नाही. याची अनेक उदाहरणे आहेत. ज्यामध्ये रस्ते असतील, पावसाळमुळे साचलेल्या पाण्याचा निचरा असेल, पाणी पुरवठा असेल, मलनिस्सारण व्यवस्था असेल ही अनेक ठिकाणी खचलेलीच आहे. त्याला उत्तर देतांना मनपा आयुक्त मात्र लवकरच काम होईल असे तकलादू उत्तर देतात.
यंदा पावसाने उशीरा आपला प्रभाव दाखवला.पण जेंव्हा प्रभाव दाखवला तेंव्हा तो जोरदारच होता. नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन ते बस स्थानक जाणारा रस्ता तर मृत्यूचाच रस्ता आहे असे म्हटले तर चुक रणार नाही. काल या रस्त्यावर एम.एच.20 बी.एल.1615 ही बस बसस्थानकाकडे जात असतांना दुसऱ्या डाव्या वळणावर त्या रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यांमुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि ती गाडी डाव्या बाजूने नालीत फसली. त्या गाडीमध्ये असलेल्या प्रवाशांची अवस्था काय झाली असेल. कारण गाडी ज्या पध्दतीने अडकलेली दिसते त्या पध्दतीने गाडीमध्ये जाण्या-येण्यासाठी असणारा सर्व सामान्य दरवाजा त्या भिंतीला चिटकलेला होता. अशा दुर्धर रस्त्यावरून प्रवास करतांना महानगरपालिकेच्या जबाबदारीची जाणिव कोणाला आहे. मनपा आयुक्त तर कधी त्या रस्त्याने जातच नसतील त्यामुळे त्यांना काही त्रास होतच नाही.
असाच काहीसा भाग आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत आहे. दुसरा रस्ता जुना मोंढा भागातून केळी मार्केटकडे जाणारा अर्धा भाग अशाच अवस्थेत आहे. गाडीपुरा भागातील रस्ता सुध्दा अत्यंत दुर्मिळ अवस्थेत आहे.वजिराबाद भागातील तिरंगा चौक ते पुर्वेकडे येणारा रस्ता या रस्त्यावर सुध्दा अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे दिसले नाही आणि अपघात झाले असे असंख्य प्रकार घडले आहेत. परंतू दाद कोणाकडे मागणार. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो आणि आपल्याला झालेल्या अपघाताची जबाबदारी महानगरपालिकेची आहे हे सिध्द करण्याची तयारी ठेवली तर महानगरपालिकेला त्यासाठी बऱ्याच व्यासपीठांवर बोलवता येते.