नांदेड(प्रतिनिधी)-आश्रम शाळेत शिक्षक आणि केंद्रीय विद्यालयात अशा दोनजागी शिक्षकांची नोकरी करून 8 लाख 58 हजार 763 रूपये अशी दुहेरी पगार उचलणाऱ्या शिक्षकास आश्रमशाळेच्या संस्थाचालकाला आरोपी करण्यात आले आहे. हा प्रकार सन 2014 ते 2017 मध्ये घडलेला आहे.
समाज कल्याण अधिकारी बापू सोपानराव दासरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेख अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक रा. देगलूर नाका नांदेड, याला महात्मा फुले उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघाळा नांदेड येथे शिक्षकाची नोकरी होती. या संस्थेचे संस्थापक भगवानराव बाबाराव इंगेवाड हे आहेत. त्यांच्या मदतीने शेख अब्दुल सत्तारने सन 2014 ते 2017 या कालखंडात केंद्रीय विद्यालयात सुद्धा नोकरी केली. आश्रमशाळेतून मिळालेले त्याच काळाचे वेतन 5 लाख 74 हजार 143 रूपये आहे आणि केंद्रीय विद्यालयातून मिळवलेले वेतन 2 लाख 84 हजार 620 रूपये आहे. आश्रमशाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकाला ती आश्रमशाळा सोडून दुसरीकडे जाता येत नाही. यासाठी संस्थाचालक भगवानराव बाबाराव इंगेवाड यांनी मदत केल्यामुळेच शेख अब्दुल सत्तार याने केंद्रीय विद्यालय, व्यवस्थापक रेल्वे कार्यालय येथे काम केले.
या सर्व बाबीची चौकशी झाल्यानंतर शेख अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक याने केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांची फसवणूक केल्याचे दिसते. तसेच आश्रमशाळेचे संस्थाचालक भगवानराव बाबाराव इंगेवाड यांनी शेख अब्दुल सत्तारला मदत केली आणि त्यांनी दोघांनी मिळून शासनाच्या 8 लाख 58 हजार 763 रूपयांना चुना लावला. या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम 420, 406, 409 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 638/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.