तिन्ही मारेकरी गजाआड
नांदेड(प्रतिनिधी)-घराच्या पाठीमागे बसून दारु पिणाऱ्यांना मनाई करणाऱ्या युवकाचा त्या पिदाड्यांनी 6 तासात खून करून टाकला. यापैकी तिघांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मृत्यूची किंमत किती किमान झाली आहे असे या घटनेवरून दिसते.
बिलाननगर भागात 13 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास सय्यद सलमान सय्यद युनूस यांच्या घराच्या पाठीमागे बसून दारु पित असणाऱ्या तीन युवकांना त्याने मनाई केली. यानंतर ते तिघे निघून गेले. दि.14 जुलैच्या मध्यरानंतर 1 वाजेच्या सुमारास शेख अक्रम शेख महेबुब, शेख आमीर शेख मोहम्मद आणि सय्यद असलम सय्यद आलम हे तिन जण त्यांच्या घरासमोर आले आणि त्यांनी सय्यद सलमानला आवाज दिला. तो बाहेर निघाला तेंव्हा या तिघांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला घरापासून दुर नेत असतांना सय्यद सलमानचा भाऊ सय्यद अरबाज हा त्यांच्या पाठीमागे जात असतांना अचानकच सय्यद सलमानच्या ओरडण्याचा आवाज आला. त्या तिन पिदाड्यांनी त्याच्या मांडीवर खंजीर ूपसवून त्याला खाली पाडे होते आणि त्याला लाथा बुक्यांनी मारहाण करत होते. सय्यद अरबाज आणि घरातील इतर भाऊ, नातलग आणि गल्लीतील लोक पळत गेले असतांना तिघे हल्लेखोर पळून गेले. नातलगांनी जखमी सय्यद सलमानला त्वरीत प्रभावाने ऍटोमध्ये टाकून दवाखान्यात नेले असतांना त्याचा मृत्यू झाला.
सय्यद अरबाज सय्यद युनूस यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(3), 115(2), 3(5) आणि भारतीय हत्यार कायदा कलम 25/27 नुसार गुन्हा क्रमांक 598/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन गढवे यांच्याकडे देण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी अत्यंत जलदगतीने हालचाल करून सर्व हल्लेखोर शेख अक्रम शेख महेबुब,सय्यद असलम सय्यद आलम आणि शेख आमीर शेख मोहम्मद यांना ताब्यात घेतले आहे.