नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत येणाऱ्या गौरी-गणपती उत्सवात पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधा पत्रिका शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा म्हणून वितरीत केला जाणार आहे असा शासन निर्णय राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागाने निर्गमित केला आहे. या शासन निर्णयावर उपसचिव संतोष गायकवाड यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
राज्यात छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागापूर विभागातील वर्धा या जिल्ह्यांमध्ये 14 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर जिल्ह्यातील दारिद्र रेषेवरील केसरी शिधा पत्रिका धारकांना सवलतीच्या दरात खाद्य वस्तु उपलब्ध करून देण्याकरीता राज्यात सन 2022 च्या दिवाळी, 2023 गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गौरी-गणपती उत्सव व दिवाळी. सन 2024 च्या श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती या प्रसंगांवर आनंदा शिधा वितरीत करण्यात आला आहे.
याच धर्तीवर सन 2024 च्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या प्राणा रवा, चनादाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल आनंदाचा शिधा म्हणून प्रति शिधा पत्रिका एक शिधा जिन्नस संच वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात 1 कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा अगोदर वाटण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या एका महिन्याच्या कालावधीत ई-पॉश प्रणालीद्वारे 100 रुपये प्रति संच सवलतीच्या दरात हा आनंदाचा शिधा वाटला जाणार आहे. त्यासाठी होणाऱ्या 562.51 कोटी इतक्या अंदाजित खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे. शासनाने आपला हा निर्णय संकेतांक क्रमांक 202407121553059506 नुसार आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.