टी.सी. देण्यासाठी कुलरच्या रुपात लाचेची मागणी ; संस्थाचालक आणि मुख्याध्यापकाविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका शाळेतील संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांनी लाचेमध्ये कुलरची मागणी केली. पण तडजोडीनंतर ही रक्कम 3 हजार रुपये ठरली. या मागणीसाठी संस्था चालक आणि मुख्याध्यापकाविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वृत्तलिहिपर्यंत हा गुन्हा कुंटूर पोलीस ठाण्यात होत होता.
एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे 2 जुलै रोजी तक्रार दिली की, त्यांची मुलगी मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोमठाणा ता.नायगाव येथून 12 वीची परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. आपल्या मुलीची टी.सी.काढण्यासाठी तक्रारदार शाळेत गेले असतांना संस्था चालक मनोहर पुंडलिकराव पवार आणि मुख्याध्यापक बहिनाजी वरवंटे यांनी सध्या सुरू असलेल्या उकाड्याच्या संदर्भाने मुलीची 12 वी उर्त्तीण झाल्याची टी.सी. हवी असेल तर 12 हजार रुपये किंमतीचा सिमफनी कंपनीचा कुलर द्या अशी लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड झाली आणि या तडजोडीत 3 हजार रुपये फोनद्वारे मागणी करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक वरवंटे यांच्याकडे ते पैसे देण्यासाठी संस्था चालकाने सांगितले. या लाच मागणीची पडताळणी 2 जुलै रोजी झाली. पण लाच मागणाऱ्यांनी पैसे स्विकारले नाहीत. बहुदा त्यांना लाच लुचपत विभागाची कुणकुण लागली असावी. परंतू लाच मागणी केली होती. या संदर्भाने कुंटूर पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल होत आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या निरिक्षणात ही कार्यवाही करण्यात आली. ही माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोण्यात्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्ती (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करुन घेण्यासाठी कायदेशीर फि व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टो फ्रि क्रमांक 1062 यावर माहिती देवून भ्रष्टाचार रोखण्यात पुढकार घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *