माजी खा.खतगावकर, विद्यमान खा.चव्हाण व खा.आष्टीकर जिल्हा बॅंकेचे फॉरेंन्सिक ऑडीट होवू देत नाहीत-विजयदादा सोनवणे

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील सहकार आयुक्तांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे फॉरेन्सिक ऑडीट पुर्ण करण्यासाठी 28 जूनची मुदत दिली असतांना सुध्दा आजपर्यंत ते फॉरेन्सिक ऑडीट पुर्ण झाले नाही. या संदर्भाने माहिती देतांना रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे यांनी सांगितले की, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर आणि विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण आणि खा. नागेश पाटील आष्टीकर हे फॉरेन्सिक ऑडीट होवू देत नाहीत. कारण त्यामुळे अनेकांचे दुकान उघडे होतील अशी त्यांना भिती वाटते.
निशा विजय सोनवणे यांनी बॅंकेत बनावट एटीएमद्वारे 19 हजार रुपये उचलल्याची तक्रार दिली होती. त्या संदर्भाने उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे यांनी एका बॅंक शाखेत झालेल्या या बनावट एटीएम प्रकरणी आवाज उठविला. त्यांच्या अर्जाप्रमाणे नांदेड जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या 63 शाखा आहेत. या सर्व शाखांमध्ये बनावट एटीएम तयार करून शेतकऱ्यांचे आलेले अनुदान खाल्याप्रकरणी चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी होती. या मागणीला सहकार आयुक्तांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद देत. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 78 (अ) अन्वये संचालक मंडळ निलंबित करून त्यांना निषप्रभावती करून शानामार्फत बॅंकेतील डिजिटल सायबर प्रणालीचे फॉरेन्सिक ऑडीट व्हावेत असे आदेश दिले होते.
या संदर्भाने बॅंकेने 20 जानेवारी 2024 च्या संचालक मंडळ बैठकीत फॉरेन्सिक ऑडीट करण्यास होकार दर्शविला होता. तरी त्या संदर्भाने आजपर्यंत डिजिटल ऑडीट झालेले नाही. या संदर्भाने विभागीय सहनिबंधक सुनिल शिरपुरकर, जिल्हा उपनिबंधक विश्र्वास देशमुख यांनी बॅंकेला लिहिलेले पत्र वास्तव न्युज लाईव्हकडे पाठविले आणि प्रत्यक्ष भेट झाली तेंव्हा सांगितले की, शेतकऱ्यांच्या नावावर बनावट एटीएम कार्ड तयार करून शासनाकडून येणारे शेतीचे अनुदान गायब करण्याचा हा नवीन धंदा बॅंकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संमतीशिवाय होणे शक्यच नाही. या संदर्भाने मी घेतलेल्या माहितीनुसार माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण आणि खा. नागेश पाटील आष्टीकर हे फॉरेन्सिक ऑडीट होवू न देण्यामध्ये सर्वात पुढे आहेत असे विजयदादा सोनवणे म्हणाले. या संदर्भाने 63 बॅंकेत किती शेतकऱ्यांचे बनावट एटीएम वापरुन शासनाचा निधी लुटण्याचा धंदा सुरू आहे. हे उघड होणे आवश्यक आहे. कारण जो खरा लाभार्थी आहे त्याला अंधारात ठेवून ही बनावट गिरी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सुरू आहे असे विजयदादा सोनवणे यांनी संागितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *