रिंदाच्या नावासह दाखल झालेल्या गुन्ह्यातील दोन आरोपींची मुक्तता

नांदेड(प्रतिनिधी)-रिंदासह अनेक आरोपींची नावे असणारे अनेक खटले नांदेड न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यातील एका व्यापाऱ्यावर रिंदाने खंडणी मागण्याच्या कारणावरुन झालेल्या गोळीबार प्रकरणात रिंदा तर फरार आरोपी राहिलाच. परंतू इतर दोघांची न्यायालयाने तपासातील त्रुटीमुळे सुटका केली आहे.
दि.14 डिसेंबर 2018 रोजी रात्री 9 वाजतच्या सुमारास आपली दुकान बंद करून घरी जाणाऱ्या आशिष रमेश पाटणी या व्यापाऱ्यावर बालाजी मंदिराजवळ तोंड बांधलेल्या, काळा कपडा बांधलेल्या दोन जणांनी गोळीबार केला. त्यांनी तीन गोळ्या झाड्या होत्या. त्यातील एक गोळी आशिष पाटणी यांच्या पिंडरीवर लागली होती. या प्रकरणी वजिराबाद पोलीसंानी आशिष पाटणीच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 376/2018 दाखल केला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 307, 109, 201, 384, 34 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 जोडण्यात आली होती. याप्रकरणात वजिराबाद पोलीसांनी शोध घेवून प्रेमसिंघ उर्फ पम्या विठ्ठलसिंघ सपुरे (25) आणि मुक्तेश्र्वर उर्फ गोली विजय मंगनाळे (22) यांना अटक केली. पोलीसांच्या दोषारोपपत्राप्रमाणे या दोघांना हरविंदरसिंघ उर्फ रिंदा याने सांगितल्यामुळे त्यांनी आशिष पाटणीवर गोळीबार केला होता. गोळीबार झाल्यानंतर आशिष पाटणी आणि त्याचे काका यांनी व्हाटसऍपवर आलेला फोन उचलला होता. तो रिंदाचा होता. पहिला फोन न उचलण्याचा परिणाम पाहिला काय? असे सांगून धमकी देण्यात आली होती. पोलीसांनी पकडलेले दोन आरोपी आणि हरविंदरसिंघ रिंदा हा फरार आरोपी अशा तिघांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात हा सत्र खटला 165/2019 यानुसार चालला.
न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही.कोकारे यांच्या समक्ष या खटल्याची सुनावणी झाली. ज्यामध्ये सहा साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. या प्रकरणात जप्त केलेली बंदुक आणि त्यातून गोळीबार झाले असा अहवाल वैद्य वैज्ञानिक प्रयोग शाळा कलीना यांच्याकडून न्यायालयात निकापर्यंत प्राप्तच झाला नाही. एकंदरीतच या दोघांनी आशिष पाटणीवर गोळीबार केला. हा घटनाक्रम न्यायालया समक्ष सिध्द न झाल्याने न्यायाधीश कोकरे यांनी आशिष प्रेमसिंघ उर्फ पम्या सपुरे आणि मुक्तेश्र्वर उर्फ गोलु मंगनाळे या दोंघाची मुक्तता केली आहे. या प्रकरणातील तिसरा फरार आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा हा तर आजच्या परिस्थितीत भारताच्या पोलीसांच्या आवाक्या बाहेर आहे.
या खटल्यात विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव दलजितकौर जज यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य लोक अभिरक्षक ऍड.ऋषीकेश संतान यांनी आरोपींच्यावतीने बाजू मांडली. त्यांच्यासोबत ऍड.अभिजित सराफ आणि ऍड.शेख शकील यांनी काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *