प्रसार माध्यमांनी आपला नंबर पहिला म्हणून उत्कृष्ट शिक्षकाची केली बदनामी

 

नांदेड (प्रतिनिधी)-‘पत्रकाराची लेखणी दुधारी लागू नये कुणाच्या जिव्हारी’ असे शब्द प्रसिध्द गीतकार जगदीश खेबुडकर यांनी एका पत्रकाराच्या डायरीवर लिहिले होते. पण या शब्दांच्या विरुध्द चालत लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाने नीट परिक्षेच्या संदर्भात कालपासून आजपर्यंत केलेल्या बातम्यांमुळे काही जणांच्या जीवनात उलथापालथ होण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारे खोट्या बातम्या आणि प्रसिध्दीस येणार्‍या प्रसार माध्यमांवर त्यांना परवाना देणार्‍यांनी बंदी आणली पाहिजे, असे एका शिक्षकाने सांगितले आहे.

काल दि.२२ जून रोजी लातूर येथून नीट परिक्षासंदर्भाने नांदेडच्या एटीएस पथकाने दोन जणांना उचलले, त्यांना दिल्लीला नेले, त्यांना नांदेडला नेले, नीट परिक्षेत त्यांचा सहभाग आहे अशा संदर्भाच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. परंतू आज लातूर येथील शिक्षक जमील पठाण यांनी दिलेल्या एका मुलाखतीनुसार त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे बोलाविण्यात आले होते. किंबहुना एटीएसने आपल्या गाडीत बसवून त्यांना तेथे नेले होते तेथे त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, मोबाईल तपासण्यात आला आणि नंतर सन्मानाने त्यांना परत त्यांच्या घरी एटीएसने आपल्याच गाडीत आणून सोडले. अशी माहिती खुद्द शिक्षक जमीन पठाण यांनी दिली.

जमील पठाण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातपूर जि.लातूर येथे मुख्याध्यापक आहेत. त्यांच्यासोबत जाधव यांना सुध्दा एटीएसने बोलाविले होते पण त्यांनाही चौकशी नंतर परत घरी सोडून देण्यात आले. मुलाखत देताना जमील पठाण सांगत होते, मी घरीच आहे, माझे घर बंद आहे, मला दिल्लीला नेले आहे, मला नांदेडला नेले आहे अशा स्वरुपाच्या बातम्या प्रसार माध्यम प्रसिध्द करीत आहेत. यावर खेद व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, जी कुणी संस्था या प्रसार माध्यमांना परवाना देत असेल त्यांनी त्यांचा परवाना रद्द करायला हवा. चुकीच्या बातम्यामुळे माझ्या कुटुंबाला, माझ्या मित्रांना, माझ्या विद्यार्थ्यांना माझ्याबद्दल वाटणारी भावना किती वाईट झाली असेल आता मी ती कशी दुरुस्त करायची असा प्रश्न जमील पठाण विचारत होते.

भारतातील लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ या नावाखाली अनेक प्रकारच्या चुकीच्या वृत्तांना प्रसिध्दी देवून आम्हीच पहिला क्रमांक मारला हे दाखविण्याची होड प्रसार माध्यमांमध्ये रुजत चालली आहे आणि त्यातूनच जमील पठाण सारख्या चांगल्या शिक्षकांच्या विषयी चुकीच्या भावना पसरविल्या जात आहेत. प्रसिध्दी गीतकार जगदीश खेबुडकर यांनी आपल्याला भेटलेल्या एका पत्रकाराच्या डायरीवर असे शब्द लिहिले होते की, पत्रकाराची लेखणी दुधारी लागू नये कोणाच्या जिव्हारी पण या शब्दांना प्रसार माध्यमे प्रत्यक्षात न घेता आपलीच रि ओढण्यात मग्न आहेत. याला कुठे तरी नक्कीच जाब विचारायला हवा.

एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळपर्यंत तरी कोणालाच अटक झालेली नाही. आता तरी प्रसारमाध्यमांनी काहीतरी शिकण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *