नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षकांच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेऊन गुजरात राज्यात तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका चार चाकी चालकाला विशेष पोक्सो न्यायालयातील न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी 7 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.20 जानेवारी 2022 रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेला संतोष मारोती भंडारे (24) रा.बहाद्दरपुरा ता.कंधार या व्यक्तीने पळवून नेले. संतोष भंडारे हा चार चाकी गाडीवर ड्रायव्हर आहे. या बाबत अल्पवयीन बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमान्वये गुन्हा क्रमांक 25/2022 21 जानेवारी 2022 रोजी दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक शेख नवाब यांनी केला.
पळवून नेलेली अल्पवयीन बालिका शिक्षकाची मुलगी आहे.मुलीचे नातलग आणि पोलीस यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार संतोष भंडारेे अल्पवयीन बालिकेला घेवून अहमदाबाद (गुजरात) येथे जात आहे. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग केला त्या ठिकाणी एक किरायाची रुम घेवून े दोघे राहिले आणि त्या घरात अल्पवयीन बालिकेवर संतोष भंडारेने अत्याचार केले. पोलीस पथकाने दोघांना तेथून नांदेडला आणले. त्यानंतर अल्पवयीन बालिकेचा फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 164 प्रमाणे न्यायालयासमक्ष जबाब नोंदविण्यात आला. इतर कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून शेख नवाब यांनी संतोष भंडारे विरुध्द अत्याचाराची आणि पोक्सो कायदाची कलमे जोडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात या प्रकरणी 10 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. सरकार पक्षाच्यावतीने ऍड.रणजित देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना फिर्यादी पक्षाच्यावतीने ऍड.अनुप पांडे यांनी मदत केली. आपल्या युक्तीवादात पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा केला नाही हे सिध्द करणे आरोपीची जबाबदारी असते आणि आरोपीने तसे केले नाही असा मुद्दा मांडण्यात आला. सोबतच या प्रकरणाशी जुडणाऱ्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील निकालाचे दाखले आरोपीला शिक्षा देण्यासाठी कसे जुळतात असे सादरीकरण करण्यात आले. एकूण उपलब्ध पुरावा आणि युक्तीवाद ऐकून न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी अल्पवयीन बालिकेला पळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संतोष भंडारेला 7 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे संतोष मारोती भंडारे हा विवाहित असून त्याला एक बाळ पण आहे. भाग्यनगरचे पोलीस अंमलदार सादीक पटेल यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका बजावली.