नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय ही इमारत त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागेत आहे. पण या इमारतीच्या शेजारी असणाऱ्या नागरीकांनी अतिक्रमण करून घाण पाणी आणि कचरा या इमारतीच्या परिसरात टाकत असल्यामुळे अधिकाऱ्यांसह या कार्यालयात येणाऱ्या नागरीकांचा याचा आरोग्यावर परिणाम पडत आहे. यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा स्वरुपाचे पत्र जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयाने मनपा आयुक्ताना दिले असतांनाही आयुक्तांनी मात्र या पत्राला कैराची टोपली दाखवली.
शहरातील इमारत क्रमांक 1-17-1155 या क्रमांकाची इमारती शासकीय मालकीची असून सदरील इमारत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मालकीची आहे. या इमारतीत एकूण तीन शासकीय कार्यालय आहेत. या ठिकाणी नागरीकांची मोठ्या प्रमाणात ये-जा कामानिमित्त असते. पण इमारतीच्या मागील बाजूस एका नागरीकाने अतिक्रमण करून संपुर्ण घाणीचे पाणी आणि कचरा शासकीय इमारतीच्या आवारात सोडला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून या ठिकाणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच नागरीकांनाही आरोग्यााचा धोका निर्माण झाला आहे. याबाबतची सविस्तर माहिती उपनिबंधक सहकारी कार्यालयाने महापालिका आयुक्ताला दिली असतांनाही व त्यांना अशा प्रकारे निवेदनही दिले असतांना मनपा आयुक्त डॉ.डोईफोडे यांनी मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याऐवजी अतिक्रमण धारकाचीच बाजू घेवून त्यांनाच अभय देत असल्याचे या घटनेवरून समोर येते. एकंदरीत महापालिका आयुक्त आणि अतिक्रमणधारक हे एकमेकात काही साठेलोटे आहे काय अशी चर्चा आता या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरीक बोलून दाखवत आहे. तात्काळ महापालिका प्रशासनाने कडक पाऊले उचलून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशीही मागणी समोर येत आहे.