नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्या वाटपाची बोली सुरू होती. यातील काही गाळे वाटप झाले होते आणि शेवटच्या टप्यातील गाळे वाटपाचा कार्यक्रम सुरू असतांना यात काही तरी गौडबंगाल असल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी आणि बाजार समितीच्या संचालकात शाब्दीक चकामक सुरूवातीला झाली आणि त्याचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमऱ्यात टिपला गेला आणि सोशल मिडीयावर व्हायरल झाला.
हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची एक हाती सत्ता आहे. या एक हाती सत्तेमुळे आ.जवळगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी हुकूमशाही करण्याची पध्दत सुरू केली. आमदार असल्यामुळे आमचे कोणीही काही करू शकत नाही असे संचालक मंडळ म्हणून लागले. 15 जून रोजी गाळ्या वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. यात एकूण 77 गाळे वाटप करण्यात येणार होते. यामध्ये काही व्यापाऱ्यांनी 10 हजार रुपये भरून या लिलावामध्ये भाग घेतला. हा लिलाव सकाळी 11 वाजता सुरू झाला. विशेषत: हा लिलाव होणार असल्याची माहिती काही मोजक्याच व्यापाऱ्यांना देण्यात आली होती आणि यातील जवळच्या आमदारांच्या खिशातील व्यापाऱ्यांना कमी भावाने गाळ्या वाटप करण्यात आले अशी चर्चा यावेळी सुरू झाली. गाळे वाटपाचा हा प्रकार जवळपास कोट्यावधी रुपयांच्या आसपासचा उलाढाल आहे. संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यात चांगलाच वाद पेटला होता. सुरूवातीला शाब्दीक बाचाबाची झाली आणि याचेनंतर रुपांतर धक्काबुक्कीपर्यंत पोहचले. हा सर्व प्रकार त्या ठिकाणच्या नागरीकांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि तात्काळ सोशल मिडीयावर व्हायरलपण केला. यामुळे याची चर्चा संपुर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. काही वेळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलीसांनी मध्यस्थिती करत हा तणाव मिटवला आहे. आता या ठिकाणच्या वापऱ्यांनी पुन्हा गाळे लिलाव करण्यात यावा अशी मागणीही आता समोर येत आहे. एकीकडे आमदारांच्याच काही मंडळींनी यामध्ये सहभाग घेवून कमी दराने गाळे घेतल्याची ओरड सुरू आहे. यामध्ये आता संपुर्ण लिलाव प्रक्रीया घेण्यात यावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.