नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व आढावा घेत काही भागामध्ये ड्रेनेज व नालेसफाई करण्यात आली आहे. तरीही बर्याच ठिकाणी डे्रनेज व नाल्यांमध्ये कचरा अडकून रस्त्यावर पाणी येत आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असून महापालिकेने पुन्हा एकदा शहरात सर्वच भागात स्वच्छता मोहिम राबवून ड्रेनेज व नालेसफाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांनी दिला आहे.
शहरातील विविध भागात मागील वर्षी पावसामुळे परिसरातील कचरा, नाली आणि ड्रेनेजमध्ये जाऊन अडकून बसल्यामुळे रस्त्यावरून पाणी जात होते. बर्याच ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा अडकून बसला होता. दोन दिवसांपुर्वी नांदेड शहरात पहिलाच पाऊस झाला. या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामाची दाणादाण उडाली आहे. रेल्वे स्टेशन, वजिराबाद, महावीर चौक, जुना मोंढा या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे साचल होते. रस्त्यावरील पाणी नाल्यांमधून वाहत नव्हते. नाल्या आणि ड्रेनेजमध्ये कचरा अडकल्याने हा प्रका घडला होता. त्यामुळे येणार्या काळात नांदेड शहरातील मुख्य रस्ता, डे्रनेज, नाल्यांमधील स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या प्रशासकीय अधिकार्यांकडून पाहणी करण्यात आली. काही प्रमाणात स्वच्छता करण्यात आली, परंतु बर्याच ठिकाणी अजूनही स्वच्छता करण्यात आली नाही. पाऊस पडला तर पुन्हा अस्वच्छता निर्माण होऊ शकते. वजिराबाद, शिवाजीनगर, कलामंदिर, आयटीआय या मुख्य रस्त्यांसह देगावचाळ, नल्लागुट्टाचाळ, भीमघाट, गंगाचाळ, पंचशीलनगर, भैय्यासाहेब आंबेडकरनगर, खडकपूरा, पक्कीचाळ, जयभीमनगर, आंबेडकरनगर, देगलूर नाका, इतवारा या भागामध्ये महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहिम राबवावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांनी दिला आहे.