भारतीय जनता पार्टीला कुबड्यांशिवाय सरकार बनविणे अशक्य

नांदेड-18 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अति आत्मविश्र्वासाला भारतीय जनतेने धक्का दिला आहे. प्रगल्भ लोकशाहीच्या सर्व मुद्यांना मात देत ईव्हीएमने सुध्दा सत्यता समोर आणली आहे. वृत्त लिहिपर्यंतच्या निकालानुसार भारतीय जनता पार्टीला आता सरकार बनविण्यासाठी कुबड्या शोधाव्या लागणार आहेत. सर्वात जास्त आनंद पाकिस्तानला झाला असेल अशी परिस्थिती या निवडणुकीच्या निकालाने समोर आली आहे.
सन 2024 ची 18 वी लोकसभा निवडणुक 19 एप्रिलपासून सुरू झाली. 1 जुलैपर्यंत 7 वेगवेगळ्या टप्यांमध्ये मतदान झाले. आज त्याचा निकाल जाहीर होत आहे. भारतीय जनता पार्टीला 242 जागा मिळतील, भारतीय राष्ट्रीय कॉंगे्रसला 99 जागा मिळतील, समाजवादी पार्टीला 35, तृणमुल कॉंग्रेस 29, द्रविड मुन्यत्र कळघम 22, जनता दल 14, राष्ट्रीय जनता दल 4, आम आदमी पार्टी 3 आणि इतर 95 असे गणित वृत्तलिहिपर्यंत दिसत आहे. यात थोडाफार बदल झाला तरी 400 पारची अपेक्षा असलेल्या भारतीय जनता पार्टीला मॅजिक फिगर 272 गाठण्यासाठी कुबड्यांचा शोध घ्यावा लागेल. असाच एक प्रसंग 1995 च्या अटल बिहारी वाजपयी सरकारमध्ये सुध्दा होता.
वास्तव न्युज लाईव्हने निवडणुकीच्या सुरूवातीला मोदीजी आपल्याला भिती वाटते काय? 400 पार का हवेत या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. आजच्या निकालांच्या अनुशंगाने विचार केला तर वास्तव न्युज लाईव्हची बातमी खरीच ठरली. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर सरकार बनविण्याची ताकत भारतीय जनता पार्टीमध्ये होती. तरी पण आपल्या सहकारी पक्षांना सोबत घेवून सरकार बनविले होती. त्यामुळे त्यांचा आकडा 303 झाला होता. पण आता या निवडणुकीत 242 असतांना मॅजिक फिगर अर्थात 272 ही संख्या गाठणे सुध्दा अवघड झाले आहे. आता या मॅजिक फिगरला आपल्याकडे ओढण्यासाठी भारतीय जनता पार्टीसोबत इतरही राजकीय पक्ष तयारी करत आहेत. यश कोणाला येईल हे काही दिवसात दिसेल.
प्रसार माध्यमांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये आपली विश्र्वासहार्यता पुर्णपणे गमावली. जवळपास 95 टक्के प्रसार माध्यमे कोणत्याही परिस्थिती भारतीय जनता पार्टी 400 पारच करेल असे दाखवत होते. परंतू जनतेच्या मनात काय आहे. हे आज कळण्यास सुरूवात झाली आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधिशांना जे आवडत नाही ते छापणेच खरी पत्रकारीता आहे असे सर रॉबर्ट यांनी म्हटले होते. इतर बाबी छापणे म्हणजे फक्त आपसातील नाते सांभाळण्याचा प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. पण या शब्दांना प्रत्येक जागी केराची टोपली दाखवत प्रसार माध्यमांनी गायीलेले भारतीय जनता पार्टीचे गोडवे किती खोटे होते हे दाखवले. काही प्रसार माध्यमांनी तर एवढे अती केले की, एखाद्या समुह विश्लेषणात बोलतांना दुसऱ्या राजकीय पक्षाच्या माणसाला बोलण्यासाठी 30 सेंकद आणि भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता त्यास उत्तर देतांना तो दीड मिनिट बोलत असे. याबाबी सुध्दा जनतेने ओळल्या. काल दि.3 जून रोजी कॉंग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा सुध्दा प्रसार माध्यमांनी जोकर बनवला होता. परंतू आज तिच प्रसार माध्यमे भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना काटेरी प्रश्न विचारत आहेत.लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेवरील जनतेचा विश्र्वास ढासळला आहे.
भारतीय जनता पार्टीने आपण किती चांगले आहोत हे दाखविण्यापेक्षा विरोधी पक्ष किती घाण आहेत. ते निवडुण आले तर काय-काय करतील यावर भर दिला आणि हीच बाब त्यांच्या संख्येने कमी करण्यात कारणीभुत ठरली. ज्या ठिकाणी प्रभु श्री रामाचे मंदिर बनवले. त्या ठिकाणी समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद वृत्त लिहिपर्यंत आघाडीवर आहेत. याचा अर्थ ज्या गावात राम मंदिर बनले. त्या गावातील मतदारांनी सुध्दा भारतीय जनता पार्टीला नाकारलेले दिसते. मग इतर भारतभर प्रभु श्री राम मंदिराचा प्रभाव पडणार असा अति आत्मविश्र्वास भारतीय जनता पार्टीला भोवला. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात मागच्या निवडणुकीत 74 जागा जिंगणाऱ्या भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत फक्त 34 जागांवर आघाडी आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी सुध्दा भारतीय जनता पार्टी मागे पडली आणि मागिल निवडणुकीचा त्यांचा आकडा त्यांना साध्य करता आला नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन गडकरी नेहमीच म्हणतात लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष प्रबळ असावा तरच सरकार चांगले काम करते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सरकार जरी भारतीय जनता पार्टीने कुबड्यांच्या आधारावर मिळवले तरी विरोधी पक्ष सुध्दा मजबुत झाला आहे. भारतीय जनता पार्टीला कुबड्या देणारे राजकीय पक्ष काय-काय सौदे बाजी करतील याचा तर आता काहीच नेम नाही.
भारतीय जनता पार्टीने उध्दव ठाकरे सरकारला दिलेला त्रास सुध्दा जनतेने ओळखला. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, नकली पुत्र अशा शब्दात भारतीय जनता पार्टीने उध्दव ठाकरे, शरद पवार यांची उडवलेली खिल्ली महाराष्ट्राच्या जनतेने सहन केली नाही आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या संख्या बळात मोठा झटका बसला.
ईव्हीएमवर निशाणा साधुन भारतीय जनता पार्टीवर आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाला सुध्दा या निवडणुकीने डोळे उघडले. आजपर्यंत जवळपास 50 विशेष याचिका भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आणि त्या सर्व याचिकांचा निकाल विरोधी पक्षांच्या विरोधीच लागला. आज विरोधी पक्षाला मिळालेल संख्या बळ ईव्हीएमला दोष देऊन कसे चालेल हे दाखवणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *