पोलीस दलात केलेल्या सेवेची खरी पावती सेवानिवृत्तीनंतरच मिळते-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात सेवा करतांना तुम्ही केलेल्या कामाची खरी पावती आता सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला मिळणार आहे असे प्रतिपादन अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले. नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस निरिक्षक, दोन श्रेणी पोलीस उपनिरिक्षक चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पाच पोलीस अंमलदार असे 12 जण सेवानिवृत्त झाले आहेत. या कार्यक्रमात अबिनाशकुमार बोलत होते.
पोलीस सेवेत 30 ते 38 वर्ष सेवाबजावल्यानंतर आज आपण सर्व सेवानिवृत्त होत आहात. याबद्दल मला दु:खही आहे आणि आनंदही आहे. कारण माझ्या पोलीस दलातील 12 जण आज आमच्यातून कमी होत आहेत. हे दु:ख आहे तर आपण सर्वांना आपल्या मर्जीने जगण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे अशा शब्दात अबिनाशकुमार यांनी आपल्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचा सन्मान केला. पोलीस जीवनात साहेब काय रागावेल, माझे मातहत माझे काम ऐकणार नाहीत याची चिंता होती. आता ती चिंता संपलेली आहे. आता फक्त आणि फक्त कुटूंबाला जास्त वेळ द्या. पोलीस सेवा काळात ज्यांच्याकडे जाता आले नाही. त्यांच्याकडे जा, भेटी-गाठी घ्या तसेच सामाजिक काम करा. पोलीस सेवा संपली असली तरी तुम्हाला काही माहिती भेटली आणि ती माहिती गुन्ह्यांशी संबंधीत असेल तर ती आम्हाला जरुर द्या. तसेच स्वत:च्या काही अडीअडचणी आल्या तर त्यांच्यासाठी सुध्दा आमच्याशी संपर्क साधा. नांदेड जिल्हा पोलीस दल तुमच्या मदतीला सदैव तयार राहिल असे अभिवचन अबिनाशकुमार यांनी आपल्या अधिकारी आणि अंमलदारांना दिले.
आज सेवानिवृत्त झालेले पोलीस निरिक्षक गणेश माणिकराव सोंडारे(जिल्हा विशेष शाखा नांदेड), श्रेणी पोलीस उपनिरिक्षक रामप्रुभ दगडू राठोड(पोलीस ठाणे ईस्लापूर), अंकुश धनाजी लुंगारे(पोलीस ठाणे इस्लापूर), मनोहर भगवान जाधव (गुरुद्वारा सुरक्षा पथक नांदेड), रावसाहेब शेषराव घुगे(पोलीस ठाणे शिवाजीनगर), विनायक मुगाजी पवार, नंदकुमार मारोतराव पतंगे(पोलीस मुख्यालय नांदेड), पोलीस अंमलदार सुभाष बाजीराव बनसोडे(शहर वाहतुक शाखा), भगवानसिंह नरसिंह ठाकूर(पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण), दशरथ बुडगिराम काळे, रामरेड्डी भिमरेड्डी अलंगेकर(पोलीस मुख्यालय नांदेड), सुर्यकांत विश्र्वनाथ खेडकर(पोलीस ठाणे शिवाजीनगर) या सर्वांचा सहकुटूंब सन्मान करून नांदेड जिल्हा पोलीस दलाने यांना निरोप दिला.
याप्रसंगी मुख्यालयाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील अनेक पोलीस अधिकारी, अनेक पोलीस अंमलदार आणि सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचे कुटूंबिय, मित्र मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. महिला पोलीस कल्याण विभागाच्या राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *