नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुनगर भागात एका डॉक्टरकडून लाखो रुपये खंडणी वसुल केल्यानंतर सुध्दा त्यांचे बांधकाम बंद पडावे यासाठी त्रास देणाऱ्या चार जणांविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विष्णुनगरमध्ये उमंग हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलचे संचालक डॉ.रविंद्र भुमन्ना नराड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2021 ते 2024 या दरम्यान काही जणांनी त्यांच्या आणि त्यांच्या वडीलांच्या दवाखान्याचे काम सुरू असतांना त्रास देण्यास सुरूवात केली. त्रास देणाऱ्यांच्या मागणी प्रमाणे बांधकाम शेजारची 4 ते 5 फुट जागा डॉक्टरांनी त्यांना वाहन तळासाठी द्यावी. नाही तर तुमचे काम बंद करा अशी धमकी ठेकेदारामार्फत दिली. तसेच ठेकेदाराकडे 6 लाख रुपयांची खंडणी मागून ती स्विकारली. न्यायालयात या जागेसंदर्भाने सुरू असलेला खटला मागे घेण्यासाठी 5 लाख रुपये घेतले. तरी पण त्यांची खंडणी मागण्याची प्रथा बंद झाली नाही आणि ती 22 मे 2024 पर्यंत सुरू होती. अजूनही बांधकाम करु देणार नाही, जिवे मारून टाकू अशा धमक्या हे लोक ठेकेदारांमार्फत देत आहेत. लाखोंची खंडणी घेणारे णि धमक्या देणारे व्यक्ती तुळजाराम काळुराम यादव, मोहन काळुराम यादव, विठ्ठल काळुराम यादव तिघे रा.विष्णुनगर नांदेड आणि संजय वसंतराव वानखेडे रा.मुदखेड असे आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी डॉ.रविंद्र नराड यांच्या तक्रारीनुसार 4 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 506, 34 नुसार गुन्हा क्रमांक 184/2024 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक जालींदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कव्हाळे अधिक तपास करीत आहेत.