नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील एका गावात भंडाऱ्याच्या कार्यक्रमात बनविलेल्या अंबील या पदार्थातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. 91 लोकांना नायगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत. तसेच 15 जणांची प्रकृती जास्त गंभीर असल्याने त्यांना नांदेडकडे हलविण्यात आले आहे.
15 मे रोजी लालवाडी ता.नायगाव येथील महादेव मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता जेवनाची सुरूवात झाली. जेवन रात्री उशीरापर्यंत सुरू होते. काही गावकरी घरी गेल्यावर त्यांना मळमळ, उलटी आणि पोट दुखीचा त्रास सुरू झाला. तेंव्हा आप-आपल्या नातलगांना घेवून नागरीक दवाखान्यात दाखल झाले. नायगाव ग्रामीण रुग्णालयाने तेथे आलेल्या लोकांची संख्या पाहता आणि आपल्याकडील कर्मचा्यांची कमतरता पाहता नांदेडहून वैद्यकीय पथक बोलावले. त्यात मांजरम प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.एस.एस.पिंपरे, डॉ.स्मिता मारकवाड, डॉ.शेख रफिक, डॉ.जाधव यांच्यासह अनेक कर्मचारी लालवंडीला पोहचले आहेत. अनेक खाजगी डॉक्टरांनी सुध्दा या आकस्मात प्रसंगासाठी धावून आले आणि आपल्या सेवा रुग्णांना देत आहेत. 16 मे रोजी 15 रुग्णांना त्यांची प्रकृती जास्त गंभीर असल्याने नांदेडला हलविण्यात आले आहे. सध्या सर्व लोकांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.