नांदेड(प्रतिनिधी)- नायगाव तालुक्यातील अंचोली येथे काही लोकांची घरे फोडून चोरट्यांनी 2 लाख 36 हजार 500 रुपयंाचा ऐवज चोरला आहे. भोकर येथील मारोती मंदिराजवळून एक 40 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. आर.एम.सी.कॅम्प दर्यापूर पाटी जवळून 1 लाख रुपयांचे बांधकामाचे साहित्य चोरीला गेले आहेत.
नायगाव तालुक्यातील अंचोली या गावात 8 मे च्या रात्री 10 ते 9 मेच्या पहाटे 4 वाजेदरम्यान काही घरे फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा 2 लाख 36 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शंकर रावसाहेब मोरे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या आणि साक्षीदारांच्या घरात झालेल्या चोऱ्यांचा एक गुन्हा क्रमांक 102/2024 नायगाव पोलीसांनी दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक पंडीत हे करीत आहेत.
भोकर शहरातील मारोती मंदिराजवळून चंद्रकांत सुरा राठोड यांची 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.07 व्ही.7523 चोरीला गेली आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक औटे हे करीत आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दर्यापुर पाटीजवळच्या आरएमसी कॅम्प या राज्य महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीमधून 7 मेच्या रात्री 11.30 ते 8 मेच्या पहाटे 9.30 वाजेदरम्यान जड लोखंडी सेंट्रींग प्लेट 60 नग किंमत 1 लाख रुपये कोणी तरी चोरून नेले आहेत.केटीआयएल कंपनीचे व्यवस्थापक बालाजी हनमंत भोईवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार बोरकर हे करीत आहेत.