नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आपल्या सभेची तयारी करतांना खिचडी खाऊ घालण्याची ऑफर आणून त्याला नाकारल्यानंतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ओमप्रकाश पोकर्णाविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुळात या प्रकरणात आचार संहिता भंगाची कलमे जोडणे आवश्यक असतांना फक्त भारतीय दंड संहितेची कलमे जोडून गुन्ह्याचे स्वरुप बदलले असल्याचा आरोप उमेदवार ऍड.अविनाश भोसीकर यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नांदेड लोकसभा क्षेत्रात उमेदवार असलेले ऍड.अविनाश विश्र्वनाथ भोसीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.19 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ऍड.प्रकाश आंबेडकरांची सभा होणार होती. त्या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीने नवा मोंढा येथील मैदान आरक्षीत केले होते. 18 एप्रिल रोजी ऍड.अविनाश भोसीकर आणि त्यांचे अनेक कार्यकर्तेे तेथे सभेची तयारी पाहण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कॉंग्रेसचे माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा आणि त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते आले आणि उद्या होणाऱ्या सभेच्या ठिकाणी आम्हाला खिचडी वाटप करू द्या असे म्हणाले. नाही तर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली.त्यांनी निवडणुकीच्या काळात असे करणे चुकीचे आहे. त्यांच्या बोलण्यामुळे आमची मने दु:खावले आहेत. म्हणून माझी ओमप्रकाश पोकर्णा आणि त्यांच्यासोबतच्या दोन ते तीन लोकांविरुध्द कायदेशीर तक्रार आहे. शिवाजीनगर पोलीसांनी दि.20 एप्रिल रोजी दुपारी 1.27 वाजता स्टेशन डायरी नोंद क्रमांक 8 नुसार ओमप्रकाश पोकर्णा आणि इतरांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि 34 नुसार अ दखल पात्र गुन्हा क्रमांक 149/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे यांच्याकडे देण्यात आला आहे.
या गुन्ह्याबद्दल ऍड.अविनाश भोसीकर यांच्याशी संपर्क केला असता भोसीकर म्हणाले खरे तर हा आचार संहितेचा भंग आहे. सभा वंचित बहुजन आघाडीची असतांना भारतीय जनता पार्टी त्या सभेत खिचडी वाटप कसे करू शकते. पण पोलीसांनी गुन्हा दाखल करतांना त्यात फक्त भारतीय दंड संहितेची अ दखल पात्र कलमे जोडली आहेत. मी वकील असून वकीलासोबत असा प्रकार घडतो तर सर्वसामान्य माणसासोबत पोलीस काय करत असतील असा प्रश्न ऍड.अविनाश भोसीकर यांनी उपस्थित केला.