मलनिसारण केंद्रात मरण पावलेल्या तिघांच्या संदर्भाने फक्त आकस्मात मृत्यू दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-मलनिसारण केंद्रात काम करणाऱ्या दोन मजुरांसह एका नागरीकाचा मृत्यू झाल्यानंतर कोणावरही कार्यवाही न करता फक्त आकस्मात मृत्यू दाखल झाला आहे. वास्तव न्युज लाईव्हने या संदर्भात या कामाच्या कंत्राटदारावर आक्षेप घेत कालच वृत्त प्रसिध्द केले होते.
पोलीस ठाणे विमानतळ येथे चकरधर गंगाधर पुयड यांच्या तक्रारीवरुन दाखल झालेले प्रकरण आकस्मात मृत्यू आहे. या बाबत मलनिसारण केंद्र माळटेकडी येथे 4 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता त्या मलनिसारण केंद्रात काम करण्यासाठी जमीनीखाली उतरलेले कामगार शंकर महादु वडजे(32), राजू व्यंकटी मेटकर (22) हे खाली जावून बेशुध्द झाले. याबाबत तेथे काम पाहत उभे असलेल्या लोकांमधील नागरीक गजानन लक्ष्मीकांत पुयड (30) हे सुध्दा या दोघांचा जिव वाचविण्यासाठी खाली उतरले. परंतू जमीनीखाली ऑक्सीजनची कमतरता झाली आणि हे तिन्ही जण श्वास गुदमरुन मरण पावले. या संदर्भात विमानतळ पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 प्रमाणे आकस्मात मृत्यू क्रमांक 14/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक गुरमे हे करणार आहेत.
काल वास्तव न्युज लाईव्हने हे वृत्त प्रकाशीत केले होते तेंव्हा कोणत्याही कामावर काम करणाऱ्या मजुरांची, कामगारांच्या जिवाची रक्षा करणे, त्यासाठी आवश्यक असलेली यंत्र सामुग्री उपलब्ध ठेवणे ही जबाबदारी कामाच्या कंत्राटदाराची आहे. पण ती कोणतीच यंत्रणा उपलब्ध नव्हती आणि म्हणूनच या तिघांचा मृत्यू झाला आहे. असा बातमीचा आशय होता. पण दाखल झालेल्या आकस्मात मृत्यूमुळे वास्तव न्युज लाईव्हने लिहिलेल्या सत्यतेची दखल घेतली गेली नाही असे आज तरी दिसते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *